| पनवेल | प्रतिनिधी |
शासनाने मद्य विक्रीकरीता वाईन शॉप, बियरबार परमिट रूम व बियर शॉपी धारकांना कडक नियमावलीच्या आधारे मद्य विक्रीचे परवाने दिले आहेत. त्या नियमावलीला अनुसरून मद्य विक्रेते आपला व्यवसाय करीत असतात. परंतु, संपुर्ण जिल्ह्यात काही ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क अधिक्षकांच्या आशिर्वादानेच ढाब्यांवरच दारूची अवैधरीत्या विक्री केली जात आहे. असा आरोप अधिकृत मद्य विक्री परवाना प्राप्त धारकांकडून केला जात आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी बिअर शॉपीचा परवाना घेऊन साहेबांच्या आर्शीवादाने तेथे चक्क विविध प्रकारच्या उच्च प्रतीची दारू विक्री केली जात आहे. काही वाईन शॉप व बिअर बार परमिट रूम वाल्यांनी सांगीतले की, आम्ही भरमसाठ भाडे जागा मालकाला देऊन व लाखो रुपये शासनाची फी भरून सद्य स्थीतीत गल्ली बोळात अवैध दारू विक्री केंद्र बोकाळले आहेत. त्यामुळे आम्ही आर्थीक संकटात आहोत. मार्चमध्ये दर वर्षी आमचा परवाना नुतनीकरण करताना शासकीय फी व दप्तर तपासणी कडक रीत्या केली जाते. परंतु अवैध ढाबे, दारूचे गुत्ते यांना मात्र महीन्याकाठी राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक यांनी हप्ते बांधुन घेतल्याने त्यांना मोकळीक दिली जात आहे, असा आरोप देखील त्यांच्याकडून केला जात आहे. नागोठणे येथील जिंदाल कंपनीच्या परीसरात ज्या टपरीधारकांनी आपले साम्राज्य उभे केले आहे, तीथे तर चक्क टपरीवर अवैध दारूची खुलेआम विक्री होत असल्याची चर्चा आहे. मात्र, अधिक्षक साहेबांमुळे कर्तव्यदक्ष कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना ठोस कारवाई करता येत नसल्याचे खाजगीत बोलले जात आहे. पनवेल, पेण, नागोठणे, महाड, गोरेगाव, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, कर्जत, उरण या तालुक्यात अवैध ढाबा संस्कृती फोफावल्याने अधिकृत परवाने धारकांत राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक रायगड यांच्या प्रती नाराजी व्यक्त केली जात आहे.






