रिलायन्सच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बेणसे येथील रिलायन्स कंपनीच्या निवासी संकुलातील डी टाईप मधील रो हाऊस क्र. 10 मध्ये जबरी चोरीची घटना घडली आहे. या चोरीत सोन्या-चांदीच्या व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या स्वरूपात सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरीची ही घटना दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वा ते दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. च्या दरम्यान घडली आहे. रिलायन्स टाऊनशिपच्या प्रवेशद्वारापासून टाऊनशिप परिसरात सर्वत्र सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलेली असतानाही ही जबरी चोरीची घटना घडल्याने रिलायन्सच्या सुरक्षा एजन्सीच्या यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डी -10 या रो- हाऊस इमारतीत राहणारे रिलायन्स कंपनीचे अधिकारी नितीन मेहता हे रिलायन्स कंपनीतून सेवानिवृत्त झाल्याने त्यांनी आपल्या सामानाची आवरावर व पॅकिंग सुरू केली होती. रिलायन्स टाऊनशिपमधील निवासस्थान त्यांना सोडायचे असल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या टाऊनशिप मधील शाखेतील बँक लॉकरमध्ये असलेले सोन्या चांदीचे व हिऱ्यांचे दागिने ते घरी घेऊन आले होते. हे दागिने त्यांनी आपल्या कपाटात ठेवले होते. घरातील सामान घेऊन ते पुणे येथील आपल्या मूळ गावी जाणार होते. सामानाची आवराआवर करत असतानाच वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याचा भावाचा फोन त्यांना आल्याने त्यांनी व त्यांच्या पत्नीने तातडीने आपले घर सोडले. घर बंद स्थितीत असण्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. बंद घराचा दरवाजा व कडी कोयंडा तोडुन चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून घरफोडी व चोरी केली. या चोरीत सोन्याची चैन, अंगठी, कर्णफुले, नथ अशा विविध स्वरूपातील सोन्याचे, चांदीचे व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या स्वरूपात सुमारे 5 लाख 31 हजार 911 रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. सोने जुने असल्याने ही किंमत जुन्या दरानुसार असल्याने नवीन दरानुसार ही किंमत अंदाजे 20 लाख रुपयांवर जात असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. याशिवाय डी-35 या इमारतील घरामध्येही चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळताच रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच अलिबाग येथील हस्तरेखा तज्ञ यांनी बुधवारी (दि.4) सकाळी घटनास्थळी भेट दिली. तर अलिबाग येथील श्वान पथकानेही गुरुवारी(दि. 5) घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे. याबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी नागोठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे हे पुढील तपास करीत आहेत.