। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्यावर असताना एका पोलिसाने पाच वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. हि घटना नाताळच्या दिवशी म्हणजे बुधवारी (दि. 25) घडली आहे. याप्रकरणी आरोपी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
नाताळची सुट्टी असल्याने पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते. म्हणून बंदोबस्तासाठी आरोपी पोलीस शिपाई सचिन सस्ते तिथे होता. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता. त्यावेळी त्याने तिथे पाच वर्षीय चिमुरडीला पाहिले. त्यानंतर लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला असता ‘तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस’ असे तिला म्हणाला. मात्र घडलेला प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितला. याबाबत पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.