। माणगाव । प्रतिनिधी ।
लोणेरे येथील तरुणी हत्याकांडातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार याला अटक करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून पोलीस या नराधमाच्या मागावर होते. अखेर नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सापळा रचून रायगड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
लोणेरे येथील एका लॉजवर 22 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्वतः या प्रकरणाच्या तपासाची चक्रे फिरवली होती. आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि विविध पोलीस पथके रात्रंदिवस शोध घेत होती.
आरोपी अनिस मालदार हा सराईत गुन्हेगार असल्याने तो वारंवार आपले ठिकाण बदलत होता. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे रायगड पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं. अखेर नवी मुंबई-ठाणे परिसरातील एका गुप्त ठिकाणाहून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी अनिस मालदार याने तरुणीची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली? याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.






