वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा आनंदला


। रत्नागिरी । प्रतिनिधी।
मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाल्याने ग्रामीण भागात शेतकर्‍यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मात्र, त्यानंतर पावसाने उसंत घेतली होती. मात्र, अधूनमधून जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत असल्यामुळे भात, नागलीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत.

जिल्ह्यात एकूण 70 हजार 334 हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते. त्यासाठी साडेचार हजार क्विंटल भात बियाण्याची पेरणी करण्यात येते. याकरिता कृषी विभागातर्फे साडेचार हजार क्विंटल भात बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना बियाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी मे महिन्यातच कृषी विभागातर्फे बियाणे उपलब्ध करण्यात आले होते. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 13 हजार मेट्रिक टन खत मंजूर झाले असून, टप्प्याटप्प्याने खताची उपलब्धता करून देण्यात येत आहे. आतापर्यंत साडेपाच हजार मेट्रिक टन खताची उपलब्धता झाली आहे.

जिल्ह्यात एकूण 65,109 हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, 58 हजार 837 हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. 91,503 हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे तर 83,292 हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. याशिवाय नारळ व अन्य बागायतीसाठीही खते घालण्यात येतात. साधारणत: आंबा काढणीनंतर खते घालण्याची कामे सुरु होतात. भात लागवडीपूर्वी बागायतींना खते घातल्यास पावसाळ्यात ती चांगली लागू पडतात. त्यामुळे शेतकरी खते खरेदी करत असून, खते घालण्याचेही काम सध्या ग्रामीण भागातून सुरू झाले आहे.

Exit mobile version