जनसेवा मिनीडोअर संघटना करणार आंदोलन
| अलिबाग | प्रतिनिधी |
वेलवली खानाव ते वावेपर्यंत पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांसह चालकही त्रस्त झाले आहेत. वाहनांचे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत पत्र देऊन खड्डे बुजविण्याची मागणी केली. परंतु, त्यांनी अजूनपर्यंत कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या जनसेवा विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी खड्डे भरो आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
वेलवली खानाव ते एचपीसीएल कंपनी प्रवेशद्वार, कुणे येथील महावितरण कंपनीचे सबस्टेशन ते उसर येथील सेंट्रल बँक तसेच वावे नाका येथे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांतून वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहनांचे अपघात होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या रस्त्यावरून गेल कंपनीच्या अवजड वाहनांची वाहतूक होते. रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. पावसाळा सुरू झाला आहे. खड्डे पाण्याने भरल्यानंतर खड्ड्यांची खोली दिसून येत नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे. त्यांच्याकडून फक्त आश्वासन देण्यात आले आहे. प्रत्यक्षात ठेकेदारांकडून खड्डे भरून घेतले नाही. गाड्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रोजगारावर परिणाम होण्याबरोबरच प्रवाशांचेदेखील हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलिबाग-वावे, रामराज-सुडकोली मार्गावरील जनसेवा विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेच्यावतीने सोमवारी (दि. 23) सकाळी आठ वाजता खड्डे भरो आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.