चालक-वाहक मद्यधुंद असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; एसटी प्रशासनाविरोधात संताप
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील बागमंडला येथे मंगळवारी (दि.5) रात्री एसटी बसच्या भीषण अपघातात तीन पादचारी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगाने धावणाऱ्या बसच्या डिकीचा दरवाजा अचानक उघडल्याने रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना जबर धडक बसली. या अपघातामुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन आगाराची एसटी बस मंगळवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास बागमंडला मार्गे प्रवाशांना घेऊन जात होती. रात्री अंदाजे साडे सात वाजता बस बागमंडला परिसरातून जात असताना बसच्या बाजूचा डिकीचा दरवाजा अचानक उघडला. त्यावेळी बस भरधाव वेगात असल्याने उघड्या दरवाज्याची जोरदार धडक रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या तीन पादचाऱ्यांना बसली. या भीषण धडकेत दोन महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की तिघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. सुरुवातीला त्यांना बागमंडला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी एसटी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. बसचा चालक आणि वाहक हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. तसेच बसची योग्य तपासणी न करता ती रस्त्यावर धाववण्यात आल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
“एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च एसटी महामंडळाने उचलावा,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अपघातानंतर रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला. मात्र रात्री उशिरापर्यंत चालकाविरोधात कोणती कलमे दाखल करण्यात आली, तसेच त्याची अल्कोहोल चाचणी करण्यात आली का, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. या घटनेमुळे एसटी बसच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






