बकऱ्यांसह कुत्र्यावर हल्ला; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील सागवाडीमध्ये रात्रीपासून वाघ, बिबट्यााची दहशत पसरली आहे. सागवाडीमधील एका गोठ्यातील बकऱ्या व कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची चर्चा सुरु आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागवाडी हा परिसर दुर्गम भागातील आहे. ठाकूर समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. मोलमजूरी करून उदरनिर्वाह चालविणारा वर्ग या परिसरात आहे. काही जण बकऱ्या पालन करून त्यातून व्यवसाय चालवितात. मात्र, सोमवारी सकाळी रामा धर्मा सोनार या शेतकऱ्याच्या गोठ्यातील चार बोकड व एक बकरी तसेच बांधून ठेवलेला कुत्रा मृत अवस्थेत दिसून आला. वाघ अथवा बिबट्याच्या हल्ल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. बाजूला बिबट्याच्या नखाचे ठसेही जमीनीवर दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनपालसह वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सोमवारी सकाळी सागवाडीमध्ये दाखल झाले.
वाघ, बिबट्याच्या पाऊल खुणा दिसून येत नाहीत. तरस हा वन्य प्राणी असल्याची शक्यता आहे. सागवाडी परिसरातील नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. प्रत्येकाने सतर्क राहवे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. बकऱ्या बोकड व कुत्र्यांचा मृत्यू नक्की कोणत्या प्राण्यामुळे झाला हे अद्याप निष्पन्न झाले नाही.
एम. नझरकर
वनपाल







