उद्योजक सुरेश पाटलांवर सुनेचे गंभीर आरोप
| पेण | प्रतिनिधी |
पेण येथील हॉटेल गोमांतकचे मालक उद्योजक सूर्यकांत उर्फ सुरेश जोमा पाटील यांच्यावर त्यांची सून प्रज्ञा अमर पाटील हिने हॉटेल साई सहारा येथे नुकतीच पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले आहेत. सासरे सुरेश जोमा पाटील, नवरा अमर पाटील, दीर भरत पाटील, सासू लक्ष्मी पाटील यांच्याविरुध्द गंभीर आरोप करत सासरे सुरेशशेठ यांनी व्याजी पैसे लावण्यासाठी माझे दागिने व रोख रक्कम 23 लाख रुपये एवढी घेतली असून, पैसे कमी पडत आहेत म्हणून माझा सासरची मंडळी छळ करीत आहेत. याबाबत या अगोदर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, गुन्हा दाखल असतानादेखील 26 मार्च 2025 रोजी मला मारहाण झाली आहे. त्याबाबत 28 मार्च पेण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे, अशी माहिती प्रज्ञा पाटील हिने दिली.
प्रसार माध्यमांशी बोलताना प्रज्ञाने सांगितले की, माझे लग्न 2013 ला झाले. तेव्हापासून आजपर्यंत सासरच्या मंडळीने माझ्या घरच्या मंडळींना दागिने आणि पैशासाठी त्रास दिला आहे. मला लग्नामध्ये माहेरहून एक किलो सोनं दिल होतं. ते आणि आत्तापर्यंत 23 लाख रुपये एवढी रक्कम सासर्यांनी घेऊन ते व्याजी लावले आहेत. तसेच वारंवार आणखी पैसे मी आणावे म्हणून मला शिवीगाळ आणि मारहाण करत आहेत. मी कौटुंबिक हिंसाचाराबाबत तक्रार केली आहे. परंतु, त्यामध्ये माझ्या सासरच्या मंडळींना कोणतेही शासन झालेले नाही. त्यामुळे ते आजही मला त्रास देत आहेत. माझे सासरे हे 10 ते 12 टक्क्याने पैस व्याजी लावतात आणि हे व्याजी पैसे लावण्यासाठी पैसे कमी पडत आहेत म्हणून मला त्रास देत आहेत आणि माझ्या मुलांनादेखील त्रास होत आहे. मला न्याय हवा आहे. मला आणि माझ्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. मी वेळोवेळी तक्रार करूनदेखील माझ्या तक्रारीचा पोलीस यंत्रणही विचार करत नाही. माझे सासरे मला धमकी देतात की, ‘पोलीस माझ्या खिश्यात आहेत, एस.पी माझे मित्र आहेत, तुला जायचं आहे तिकडे जा, तुला मी हुसकावूनच लावेन.’ तसेच, सासर्यांनी रिव्हॉल्व्हरही लावल्याचे प्रज्ञा हिने प्रसार माध्यमांना सांगितले. एकंदरीत, व्याजी पैसे लावण्यासाठी सासरा आणि नवरा त्रास देत असल्याचे शेवटी प्रज्ञाने सांगितले.
प्रज्ञा हिची तक्रार 2 ऑगस्ट 2024 रोजी घेतली असून, त्याचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, 26 मार्च 2025 रोजी काही प्रकार झाला, त्याबाबत प्रज्ञा हिने 28 मार्च रोजी पेण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. त्याबाबत आम्ही चौकशी करत आहोत.
– संदीप बागुल, पोलीस निरीक्षक
पेण पोलीस ठाणे