| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध सोलनपाडा धरण परिसरात शनिवारी (दि. 2) दुर्दैवी घटना घडली. मुंबईहून आलेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा पाण्यात उडी मारताना डोक्याला व हनुवटीला दगड लागून मृत्यू झाला.
सोलनपाडा धरण परिसर पर्यटकांचे आकर्षण केंद्र असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. धरण परिसरात बंदी असल्याने काही पर्यटक जवळील नदी व बंधाऱ्यांच्या परिसरात पाण्याचा आनंद घेण्यासाठी जातात. शनिवारी मुंबईहून आलेले पाच पर्यटक सोलनपाडा गावालगत असलेल्या छोट्या नदीत पोहण्यासाठी उतरले होते. पोहण्याचा आनंद घेत असताना पाणी अडवण्यासाठी बांधलेल्या बंधाऱ्यावरून एका पर्यटकाने पाण्यात उडी मारली. मात्र उडी मारताना त्याच्या डोक्याला व हनुवटीला दगडांचा मार लागल्याने पर्यटकाचा जागीच मृत्यू होऊन. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. काही अंतरावर त्याचा मृतदेह पुलाजवळ अडकला होता. घटनेनंतर त्याचे चार मित्र व स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ते शक्य झाले नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ कशेळे पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच कशेळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी लालासाहेब तोरवे व राहुल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने संबंधित पर्यटकाला पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, तो बराच वेळ पाण्यात राहिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृत तरुणाचे नाव अरमान अब्दुल लतीफ अन्सारी (24) असे असून तो सध्या वडाळा, मुंबई येथे राहत होता. तो मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कर्जत पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी लालासाहेब तोरवे व राहुल जाधव करीत आहेत.






