वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त; चौकशीची मागणी
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिलांमध्ये अचानक वाढ झाल्याच्या तक्रारी रायगडसह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. घरातील वीज वापर पूर्वीइतकाच असतानाही दुप्पट-तिप्पट बिले येत असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात असून, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
रेवदंडा, अलिबाग, मुरुड, रोहा, पेण, पनवेलसह अनेक भागांतील ग्राहकांनी वाढीव वीजबिलांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. मीटर बदलला आणि बिल वाढलं हा अनुभव अनेक ग्राहक मांडत असल्याने स्मार्ट मीटरच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महावितरणकडून स्मार्ट मीटर अधिक अचूक असून प्रत्यक्ष वीज वापराची नोंद घेत असल्याचा दावा केला जात असला, तरी ग्राहकांना हा युक्तिवाद पटत नसल्याचे दिसून येत आहे. जुन्या मीटरमध्ये त्रुटी असतील तर त्याचा आर्थिक भार ग्राहकांनी का सहन करावा, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान, सौर ऊर्जा प्रकल्प उभारलेल्या ग्राहकांनाही अपेक्षित दिलासा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नेट मीटरिंग धोरणातील बदल, स्थिर आकार आणि विविध शुल्कांमुळे सोलर प्रणाली बसवूनही मोठी बिले येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
वीजबिलात स्थिर आकार, इंधन समायोजन शुल्क, वहन खर्च, कर आणि इतर आकारांचा समावेश असल्याने प्रत्यक्ष वीज वापर कमी असतानाही बिलाचा आकडा वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बिलातील प्रत्येक आकाराची स्पष्ट माहिती ग्राहकांना देण्याची मागणी होत आहे. स्मार्ट मीटरची स्वतंत्र तांत्रिक तपासणी, वाढीव वीजबिलांची चौकशी आणि ग्राहकांना तातडीने दिलासा देण्याची मागणी आता रायगडसह राज्यभरातून जोर धरू लागली आहे. स्मार्ट मीटरच्या नावाखाली नागरिकांना आर्थिक शॉक दिला जात आहे का? हा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.







