दिबांसाठी 1 लाख नागरिकांची सिडकोवर धडक

24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी

। पनवेल । प्रतिनिधी ।
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, यासाठी आता 24 जूनला सिडकोवर किमान 1 लाख लोकांचे धडक आंदोलन होणार आहे. त्या अनुषंगाने विभागनिहाय बैठका आणि त्यामध्ये नियोजन करत जोरदार तयारी सुरु आहे.

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतराच्या अनुषंगाने गव्हाण, पालीदेवद जिल्हा परिषद आणि पळस्पे, कोन पंचायत समिती विभाग निहाय बैठका संपन्न झाल्या. या बैठकीस अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ज्येष्ठ नेते सुभाष जेठु पाटील,पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील,माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, विविध ग्रामपंचायतींचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

10 जूनला झालेल्या भव्य आणि आदर्श अशा मानवी साखळीने संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधण्याबरोबरच वाहवा मिळवली. मनिर्धार पक्का दिबासाहेबांचेच नाव पक्काफ हि प्रामाणिक भूमिका घेत आंदोलनाचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. आता रस्त्यावर उतरून सिडकोला घेराव घालण्यासाठी 24 जून उजाडण्याची वाट पाहत आहेत. भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव घालण्यात येणार आहे.

सिडकोच्या दारातच वटपौर्णिमा
ज्येष्ठ आणि तरुणाची फौज या आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडत असताना महिलाही मागे राहिल्या नाहीत. 24 जूनला योगायोगाने याच दिवशी वटपौर्णिमा आहे. असे असले तरी भूमिपुत्र सावित्रींनी यंदाची वटपौर्णिमा या आंदोलनात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. आणि या लढाईच्या अनुषंगाने आपल्या सौभाग्याला अधिक बळ देण्यासाठी सिडकोच्या दारातच वटपौर्णिमा साजरी करणार असून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचा नाव मिळेपर्यत या संघर्षात महिलांचाही सहभाग राहणार आहे. तशी तयारीही महिला मंडळाकडून जोरदार सुरु आहे.

Exit mobile version