| मुंबई | वृत्तसंस्था |
एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपसाठी संघांची घोषणा करण्याची अंतिम तारखी 5 सप्टेंबर होती. त्यामुळेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी मंगळवारी आपल्या संघांची घोषणा केली. ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्याच्या 5 तारखेपासून भारतामध्ये खेळवली जाणार आहे. कालच भारताबरोबर दक्षिण आफ्रिकेनेही आपली 15 सदस्यांची टीम जाहीर केली आहे. दुसरीकडे इंग्लंडने आपल्या अव्वल 18 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ही प्राथमिक यादी असली तरी यामधूनच अंतिम संघ निवडला जाणार आहे. दरम्यान मंगळवारीच एका विश्वविजेत्या देशाने आपल्या संघाची घोषणा केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संघामध्ये तब्बल 10 गोलंदाज आहेत.
कर्णधारही वेगवान गोलंदाजच
भारतात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेसाठी 10 गोलंदाजांचा पर्याय असलेला संघ म्हणजे ऑस्ट्रेलियाने मंगळवारी या स्पर्धेसाठी आपल्या 15 खेळाडूंची यादी जाहीर केली. मागील महिन्याच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेसाठी 18 खेळाडूंच्या प्राथमिक यादीची घोषणा केली होती. या 18 खेळाडूंमधूनच 15 खेळाडूंची अंतिम यादी आयसीसीला देण्यात आली आहे. या संघाचं नेतृत्व वेगवान गोलंदाज असलेल्या पॅट कमिन्सकडेच देण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ 8 ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध खेळणार आहे.