दहा ते बारा हजार वर्षे पुरातन मानवाकृती आकृती स्थानिक देवता
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
लांजा तालुक्यात एकूण 23 कातळशिल्पे शोधण्यात स्थानिक तरुणांसह अभ्यासकांना यश आलेले आहे. कातळशिल्पे अश्मयुगीन कालखंडातील असून, त्यांच्या अभ्यासाला महत्व आहे. तज्ज्ञांच्या मते हे कातळशिल्पे अश्मयुगीन असून, त्यांचा कालखंड दहा ते बारा हजार वर्षे इतके पुरातन आहे.
वीरगाव येथे पिंपळाची बाऊल येथे एक शिल्प आणि सुकाड येथे 22 शिल्पे विद्यार्थी संशोधक मिलनाथ पालेरे, सुचारिता चौधरी आणि वेदवर्शिनी एस. आर. यांनी बोरगाव येथील योगेश पातेरे, सिद्धेश वीर आणि इतर शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने शोधून काढली आहेत. या शिल्पांमध्ये जलचर, भूचर या व्यतिरिक्त पक्षी, मानवाकृती शिल्प, गोपद्य आणि अनाकलनीय चित्रे कोरली गेली आहेत. यामध्ये मुख्यतः मासे, गरुड पक्षी, ससा, कांडेचोर, काळवीट, डुक्कर, मानवाकृती आणखी काही चित्रे कोरलेली आहेत. यात गरुड पक्षी सुमारे अडीच मीटर लांबीचा आहे. मानवाकृती आकृती स्थानिक देवता म्हणून ओळखली जाते.
पिंपळाची बाऊलमधील चित्रे सुमारे एक मीटर लांब आणि दीड मीटर रुंदीची आहेत. त्यांचे आकलन अजून झालेले नाही. मागील काही वर्षांपासून कोकण किनारपट्टी आणि त्या जवळील परिसराच्या जांभ्या सत्यावर कोरीव कातळशिल्पे संशोधक आणि पर्यटकांच्या निदर्शनात येत आहेत. यामुळे देशी आणि विदेशी पर्यटक, अभ्यासकांचे लक्ष कोकणातील सड्यावर वेधले गेले आहे.
कातळशिल्पाची पुजा
वीरगाव येथील मानवाकृती कातळशिल्पाला स्थानिक देवता म्हणून पाहिले जाते. या संबंधित दोन दंतकथा प्रचलित आहेत. पहिली कथा अशी की, बाजूच्या गावातील स्त्री या ठिकाणाहून जात असताना काही वाटेतील चोरांनी तिची लूटमार केली आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. दुसर्या कथेत तीच स्त्री तिच्या प्रसूतीसमयी तिच्या घरी जाताना या ठिकाणी पुत्र प्रवसली व तिचा मृत्यू झाला. पुढे तिच्या मुलाने हे शिल्प कोरले असल्याचे सांगितले जाते. गावातीललोक येता-जाता दर्शन घेतात आणि तिच्यावर अंजनी झाडाच्या फांद्या तोडून सावली म्हणून ठेवतात. येथील नागरीक आपल्या मूलबाळांसाठी व सुखासाठी करत असल्याचे अभ्यासक पातेरे यांना सांगितले.
कोकणातील कातळशिल्पांना राज्य शासनाकडून संरक्षण मिळाले आहे. यामुळे या शिल्पांना पर्यटनदृष्टीने तसेच अभ्यासू दृष्टीने पाहणे अधिक उत्तम होईल आणि त्यांच्या संवर्धनाकडेही लक्ष देता येईल. यामुळे येथील ग्रामीण जीवन विकासाच्या प्रवाहात वेग धरेल आणि विशेष म्हणजे कोकणाच्या प्रागैतिहासिक इतिहासामध्ये मोलाची भर पडेल.
– मिलनाथ पातेरे, अभ्यासक