। मुंबई । प्रतिनिधी ।
कॅबिनेट मंत्रिपद देण्याच्या नावाखाली भाजप आमदार राहुल कुल आणि जयकुमार गोरे यांच्याकडे 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौघाजणांना अटक केली आहे. फोनसंदर्भात वरिष्ठांना कल्पना दिली होती, अशी माहिती कुल आणि गोरे यांनी दिली आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार सध्या नंदनवन आणि सागर या शासकीय बंगल्यांकडे लक्ष ठेवून आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा घेत चारही आरोपींनी आमदारांना गाठून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.
आरोपीने नरिमन पॉईंट परिसरात आमदारांना भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आमदारांनी सापळा रचून आरोपींना ऑबेरॉय हॉटेलमध्ये नेले. यावेळी साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीतून इतर तीन आरोपींची नावे समोर आली आमदारांच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रियाज अल्लाबक्ष शेख (वय 41, कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (वय 57, पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (वय 37, पोखरण रस्ता, ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (वय 53, नागपाडा, मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपीने अशा पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.