107 कोटीचा अंमलपदार्थ जप्त

खोपोली पोलिसांची कारवाई


| खोपोली | प्रतिनिधी |

विद्युत खांब तयार करण्याच्या नावाखाली सुरु असलेल्या कारखान्यावर खोपोली पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. या छाप्यात 107 कोटी रुपयांच्या एमडी नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. यामध्ये तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शितल राऊत उपस्थित होते.

ढेकू गावाजवळ इंडिया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरिंग नावाचे फलक लावण्यात आले होते. त्या ठिकाणी विद्युत खांब तयार करण्याचा कारखाना असल्याचा भासवले जात होते. परंतु या ठिकाणी अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती खोपोलीच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीचे पोलीस निरीक्षक शितल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश कळसेकर, प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने, अभिजीत व्हरांबळे, पोलीस हवालदार राजेंद्र पाटील, सागर शेवते, प्रसाद पाटील, महिला पोलीस हवालदार आर. एन. गायकवाड, पोलीस नाईक सतिश बांगर, पोलीस नाईक कुंभार, पोलीस शिपाई आर. डी. चौगुले, राम मासाळ, प्रदीप खरात आदी पथकाने गुरुवारी छापा टाकला. त्यामध्ये 85 किलो 200 ग्रॅम वजनाची एमडी पावडर, पावडर बनविण्यासाठी लागणारे रसायने, साधन सामुग्री असा एकूण 107 कोटी 30 लाख 37 हजार 377 रुपयांचा साठा जप्त केला. बेकायदेशीररित्या बनावट कंपनी चालवून त्याठिकाणी अवैध धंदा राजरोसपणे सुरू होता. त्यावर अंकुश ठेवण्यास यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

Exit mobile version