मुलाच्या नोकरीसाठी गमावले 12 लाख

| पनवेल | वार्ताहर |

सीबीआय किंवा मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हीसमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून दोघा भामट्यांनी कळंबोलीतील एका व्यावसायिकाकडून तब्बल 12 लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तुषार सिध आणि संजय सुर्वे अशी या दोघा भामट्यांची नावे असून, कळंबोली पोलिसांनी त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव विजेश भोकरे (47) असे असून, ते कळंबोली, सेक्टर-3 मध्ये राहण्यास आहेत. भोकरे यांच्या साहील आणि सौरभ या दोन्ही मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्याने त्यांना नोकरी मिळावी, यासाठी ते प्रयत्न करत होते. जून 2021 मध्ये सौरभचा मित्र शुभम यादव याच्याकडून दिल्ली येथे सीबीआयमध्ये नोकरी मिळत असल्याची माहिती भाकरे यांना मिळाली होती. त्यामुळे भोकरे यांनी सौरभ आणि साहिल या दोघांना दिल्ली येथे पाठविले होते. दिल्लीमध्ये तुषार सिध आणि संजय सुर्वे त्यांना भेटले. त्यांनी मिलिटरी इंजिनिअरींग सर्व्हसमधील नोकरीसाठी 5 लाख रुपये तर सीबीआय मधील नोकरीसाठी 7 लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यामुळे भोकरे यांनी साहीलसाठी मिलिटरी इंजिनिअरींगच्या नोकरीसाठी 5 लाख रुपये तर सौरभच्या सीबीआय मधील नोकरीसाठी 7 लाख रुपये अशी 12 लाख रुपयांची रक्कम तुषार सिध आणि संजय सुर्वे या दोघांच्या खात्यावर पाठवून दिली.

भोकरे यांची दोन्ही मुले नोकरीच्या आशेने दिल्लीत थांबले होते. त्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये संजय सुर्वे याने साहील याला कानपूर येथील मिलिटरी इंजिनिअरींग सर्व्हस कॅन्टेनमेन्टचा मासिक एन्ट्री पास देऊन त्याला त्याठिकाणी कामाला पाठविले. मात्र, साहीलला तेथे तीन महिने ग्राऊंडवरील गवत काढण्याचे काम देण्यात आले. तेथे चौकशी केल्यानंतर तुषार सिध व संजय सुर्वे दोघेही मिलिटरी मध्ये नोकरीला नसल्याचे साहिलला समजले. त्यामुळे नोव्हेंबर 2021 मध्ये साहील कळंबोली येथे निघून आला. तर दुसरीकडे तुषार सिध याने सौरभला सीबीआयमधील वर्ग डी-च्या पोस्टचे अपॉईंटमेंट लेटर दाखवले. मात्र, त्याला ते दिले नाही. दोघांनाही नोकरीला लावण्याचे फक्त तोंडी आश्‍वासन देऊन ठकसेन दुक्कलीने फक्त टाळाटाळ केली. मात्र, त्यांनी कुणालाही नोकरीला लावले नाही. त्यामुळे भोकरे यांनी त्यांच्याकडे आपले पैसे परत मागितले असता ते देण्यासाठी देखील त्यांनी टाळाटाळ केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भोकरे यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Exit mobile version