| कल्याण | प्रतिनिधी |
महावितरणच्या कल्याण परिमंडळात वीज ग्राहकांकडे (उच्चदाब, कृषिपंप व कायमस्वरुपी वीज खंडित ग्राहक वगळून) 120 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या वीजबिल मागणतील जवळपास 94 कोटी रुपये वसूल होणे बाकी आहेत. त्यामुळे थकित वीजबिलाची वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकीत रकमेचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
थकबाकी वसुलीसाठी क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसमवेत विभाग, मंडल, परिमंडल कार्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी सध्या फिल्डवर आहेत. कल्याण परिमंडलात मार्च 2023 अखेर 7 हजार 851 ग्राहकांकडे 54 कोटी आणि एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान 2 लाख 52 हजार ग्राहकांकडे 43 कोटी 30 लाख कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर फेब्रुवारी महिन्यात वीजबिल भरण्याची मुदत संपलेल्या 3 लाख 52 हजार ग्राहकांकडे जवळपास 38 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
कल्याण पूर्व आणि पाश्चिम व डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडळ कार्यालय एक अंतर्गत 52 हजार 336 ग्राहकांकडे 8 कोटी 54 लाख रुपयांची थकबाकी आहे. उल्हासनगर एक आणि दोन व कल्याण ग्रामीण विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडळ दोन अंतर्गत 98 हजार 727 ग्राहकांकडे 46 कोटी 63 लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे. वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील 1 लाख 6 हजार 32 ग्राहकांकडे 21 कोटी 81 लाख तर पालघर मंडळातील 1 लाख 12 हजार 988 ग्राहकांकडे 42 कोटी 54 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे.
याशिवाय कल्याण परिमंडळात थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले 2 लाख 85 हजार ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे तब्बल 273 कोटी रुपयांची थकबाकी आहे. वसई मंडळ कार्यालयांतर्गत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले सर्वाधिक 99 हजार असून त्यांच्याकडे 101 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे.
कल्याण परिमंडळात 120 कोटींचे वीजबिल थकीत
