परीक्षा संकुलात विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी
| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने एचएससी, म्हणजेच बारावीची परीक्षा आज (दि.21) पासून सुरु झाली आहे. ही परीक्षा 19 मार्चपर्यंत असणार आहे. परीक्षेच्या कालावधीत कोणतीही गैरप्रकार घडू नये म्हणून पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.
बारावीच्या परीक्षेची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होती. परीक्षा कधी सुरु होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर उत्कंठा संपली असून, आजपासून सुरु झालेल्या परीक्षेसाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत. दरम्यान, पहिल्या पेपरसाठी अलिबाग वेश्वी येथील पी.एन.पी महाविद्यालय संकूलात विद्यार्थी व पालकांनी गर्दी केली होती. येथे तैनात पथक विद्यार्थ्यांची तपासणी करून मगच पेपरसाठी सोडत होते.
परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी पाच भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, बैठे पथक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार टाळण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शैक्षणिक संस्थाचे प्रमुख यांची कार्यशाळा 14 ते 15 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक परिरक्षण केंद्र उभारण्यात आले आहे.