आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, नागरिकांची गैरसोय दूर होणार
| नेरळ | वार्ताहर |
1906 मध्ये ब्रिटिशांनी कर्जत तालुक्याचे तहसील कार्यालय कर्जत गावातील टेकडीवर उभारले होते. मात्र सरकराने आता सुमारे 14 कोटी रुपये खर्च करुन नवीन प्रशासन भवन उभारले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते 7 जानेवारी रोजी या प्रशासन भवनचे लोकार्पण होणार आहे. एकाच छताखाली सरकारी कार्यालये येणार असल्याने जनतेची सोय होणार आहे.
देशावर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यावेळी कर्जत तालुका अस्तित्वात होता आणि त्यावेळी तालुका तहसील कार्यालय तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नसरापूर गावी होते. येथे ब्रिटिश पोलिसांची छावणी देखील होती आणि तेथूनच ब्रिटिशांची कचेरी चालविली जायची. मात्र, राजसत्तेने आपली मुख्यालये कायम समुद्राच्या कडेला किंवा डोंगरावर उभारण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे नसरापूर येथे असलेले कर्जत तहसील कार्यालय कर्जत येथे आणण्यात आले. सध्या असलेल्या तहसील कार्यालयाची दगडी ढाचे असणारी इमारत 1906 मध्ये बांधली होती. तेथे आजपर्यंत कामकाज चालत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका असतात तेव्हा तर एकेरी मार्गामुळे वाहतूक बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येते. त्यात शहराच्या एका भागात हे कचेरी कार्यालय असल्याने आर्थिक दृष्ट्या देखील खर्चिक होते. त्यामुळे गेली 20 वर्षे कर्जत तहसील कार्यालय हे शहराच्या मध्यभागी आणि सर्वांच्या सोयीच्या ठिकाणी आणावे अशी मागणी सातत्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेकडून केली जात होती.
कर्जत तहसीदार यांचे शासकीय निवास्थान असलेल्या ठिकाणी नवीन प्रशासकीय भवन उभारण्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता. 14 कोटींचा निधी या कामासाठी मंजूर झाला होता आणि त्या निधीमधून गेली दोन वर्षे सुरु असलेले काम पूर्ण झाले आहे. तीन मजली इमारत उभी राहिली असून तळमजला येथे सेतू कार्यालय आणि जमीन खरेदी-विक्री यांचे दुय्यम निबंधक कार्यालय आणि वाहनतळ असणार आहे. तर पहिल्या मजल्यावर तहसीलदार यांचे कार्यालय तसेच तहसील कार्यालयाशी संबंधीची कार्यालये आणि रेकॉर्ड रूम असणार आहेत. दुसऱ्या मजल्यावर प्रांत अधिकारी कार्यालय, स्ट्राँग रूम, कागदपत्र खोली अशी रचना असणार आहे. तळमजला येथील बांधकाम हे 410 चौरस मीटर एवढे असून पहिला आणि दुसरा मजल्यावर प्रत्येकी 1099 चौरस मीटरचे बांधकाम असून या प्रशासकीय भवनमध्ये दोन उद्वाहन यांची व्यवस्था केली असून तळमजल्यावर तसेच संपूर्ण कार्यालयाला सीसीटीव्ही कॅमेरे यांचे जाळे आदी कामे पूर्ण झाली आहेत.
