शिवसेनेच्या १६ आमदारांना शिंदे गटाचा व्हीप

। पणजी । वृत्तसंस्था ।
शिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांना व्हीप बजावला आहे. या १६ आमदारांनी गोव्यात तातडीने दाखल व्हावे असा व्हीप जारी केला आहे. आमचाच पक्ष हा शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे आता या दाव्यावरून कायदेशीर संघर्ष होणार असल्याचे म्हटले जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे गट आता अधिक आक्रमक झाला आहे. विधीमंडळात आमचाच पक्ष शिवसेना असल्याचे दावा शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाने आपल्याकडे शिवसेना आणि अपक्षांसह ५० आमदार असल्याचे म्हटले आहे. गोव्यात आज शिंदे गटाची बैठक झाली. यामध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीत आक्रमक भूमिका या गटाने घेतली आहे. या गटाने व्हीप काढला असून शिवसेनेच्या १६ आमदारांना गोव्यातील हॉटेलमध्ये बोलावले आहे. त्यांनी व्हीपचे पालन करावे असेही त्यांना म्हटले आहे. व्हीपचे पालन न झाल्यास १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

निवडणूक आयोगाकडे जाणार
एकनाथ शिंदे गट आता निवडणूक आयोगाकडे धाव घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर आणि पक्षावर दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून शिवसेना पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे काही खासदारही शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे.

Exit mobile version