| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जतचे आ. महेंद्र थोरवे यांचे कारनामे बीडमधील वाल्मिक कराडसारखे असून, ते कर्जतचे ‘वाल्मिक कराड’ असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनी केली. कर्जत तालुक्यातील पोलिसांच्या स्टेशन डायऱ्या पाहिल्या की वाल्मिक कराडसारखे कारनामे आ. थोरवेंचे असल्याचेही घारे म्हणाले. पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याच्या नोंद आपल्याकडे उपलब्ध आहेत. सांगवी येथील मंजूर निधी वळवावा, अशी मागणी आमदार थोरवे यांनी केली असल्याने आमच्या गावावर दरड कोसळली तर त्या दुर्घटनेस ते जबाबदार असतील, असा इशाराही घारेंनी दिला. दरम्यान, आमदारांचा रिसॉर्ट वन जमिनीवर असल्याने त्या जमिनीची मोजणी भूमीअभिलेख विभागाने करावी, अशी मागणीदेखील पत्रकार परिषदेत केली.
सुधाकर घारे यांनी कर्जत तालुक्यात वारंवार होत असलेल्या शासकीय अधिकारी यांच्यावर सातत्याने स्थानिक आमदार हे दबाव टाकून स्वतःची पोळी भाजण्याचे काम करतात याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर, आवेश जुवारी, माजी सभापती धोंडू राणे, मंगल ऐनकर तसेच महिला मतदारसंघ अध्यक्ष सुरेखा खेडेकर, पूजा सुर्वे आदी प्रमुख उपस्थित होते.
घारे पुढे म्हणाले की, महाड येथील कार्यक्रमात महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. महेंद्र थोरवे यांनी त्या ठिकाणी टीका करण्याची संधी सोडली नाही. तटकरे यांनी माणगाव येथील सभेत नॅपकिन हातात उडविला, तर यांना जिल्ह्यात पळताभुई थोडी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या टीका केल्यावर आपल्याला प्रसिद्धी मिळते हे महेंद्र थोरवे यांना चांगलेच कळले आहे. त्यांच्याकडे काही बोलायचे नसते आणि म्हणून त्यांना सुनील तटकरे यांच्यावर टीका करावी लागते. 2019 मध्ये भरत गोगावले नव्हते तरीदेखील सुनील तटकरे हे खासदार झाले होते, त्यामुळे महाडमध्ये खासदारीचे निवडणुकीत तटकरे यांना किती मते आणि गोगावले यांना स्वतःला किती मते मिळविली हे पाहायला गेले तर दूध का दूध आणि पाणी का पाणी हे समजून येत आहे. सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष असल्याने मला महायुतीमध्ये उमेदवारी देता येणार नाही असे सांगितल्याने आम्ही सर्व तेथून निघून आलो. त्यामुळे आता सुनील तटकरे यांनी महायुतीचे नियम पाळले नसते आज तटकरे यांच्यावर टीका करणारे आमदार थोरवे हे आमदारच झाले नसते.
पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीत नोंदी
बीडमध्ये वाल्मीक कराड प्रकरण ज्याप्रमाणे चालले होते तसेच कर्जतमध्ये ही कराड करीत आहेत. दरदिवसा हल्ला होत असताना आमच्या तालुक्यात कोण वाल्मीक आहे हे आता समजू येऊ लागले आहे. कर्जत, खालापूर, नेरळ, माथेरान या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीमध्ये माहिती मिळविली असता पोलीस निरीक्षक भोर यांनी आमदार थोरवे यांच्याबद्दल स्टेशन डायरीत नोंद केली तसेच राजकीय द्वेषातून वरिष्ठांकडे तक्रार करतात, अशी नोंद आहे. पोलीस उपअधीक्षक घेरडीकर यांनी स्टेशन डायरीत विद्यमान आमदार हे आंदोलन करण्याच्या धमक्या देतात, कामात हस्तक्षेप करतात, अशी नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना नोंद करण्यासाठी दबाव टाकला आहे. कशेळे येथील भास्कर दिसले यांचे बाजारपेठमधील दुकान तोडण्यासाठी यांची नोंद पोलीस ठाण्यात केली आहे. भिसेगाव येथील शरद हजारे यांच्याविरोधात आपल्या नातेवाईकासाठी पोलिसांना धमकावत असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
निधी वळवावा
दरड प्रवण क्षेत्र म्हणून तालुक्यातील सांगवी गावासाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी 27 कोटी रुपये आम्ही सुनील तटकरे, अदिती तटकरे यांच्या माध्यमातून निधी मंजूर करून आणला. मात्र, तो निधी मंजूर झाला आणि त्यामुळे आमदारांनी तक्रारी अर्ज करून तो निधी अन्य गावाकडे वळवावा, अशी मागणी करणारे पत्र दिले आहे. त्यामुळे आम्ही या निमित्ताने ठामपणे सांगतो की, दरडग्रस्त सांगवी गावावर दरड कोसळली तर त्यास सर्वस्वी महेंद्र थोरवे आमदार हेच जबाबदार असतील, असे सुधाकर घारे यांनी सांगवी ग्रामस्थांच्यावतीने जाहीर केले.
पॅरामाऊंट रिसॉर्ट वन जमिनीवर?
आमदार थोरवे पती-पत्नी मालक असलेल्या पॅरामाऊंट हे वनजमिनीवर आहे. त्या रिसॉर्टचे जमिनीची मोजणी झाली आहे. तर, आमदारांचे भाऊ मनोहर थोरवे यांचे सुंदर रिसॉर्ट हे गुरचरण जमिनीवर वसले आहे. यांची चौकशी व्हावी, तसेच आमदारांचे घरासमोरील तलावावर शासनाचा खर्च झाला असून, त्या तलावाच्या भिंती या आपल्या बंगल्याचा देखणेपणा वाढवण्यासाठी आपल्याकडे घेतल्या आहेत. त्या बंगल्यासमोरील तलावाच्या कामाची चौकशी रायगड जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समिती यांनी करावे, असे आवाहन केले.
महेंद्र थोरवे जातीयवादी
आ. महेंद्र थोरवे हे जातीयवादी असून, महाड येथील सभेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची तसदी घेत नाहीत. तसेच कर्जत तालुक्यातील आगरी समाजातील तरुणांना गुंतवण्यात आमदार आहेत, असे माझा थेट आरोप आहे. दुसरीकडे तुम्ही तटकरे यांच्यावर आरोप करणारे आमदार थोरवे यांचा दिवा विझवण्याची वेळ आली आहे, त्याची फडफड सुरू आहे, असा आरोप भरत भगत यांनी केला.