राज्य निवडणूक आयोगाच्या सरकारला सूचना
| रायगड | प्रतिनिधी |
राज्यातील 687 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन ते पाच वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक आहेत. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तयारीला सुरूवात केली आहे. निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधीत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लकवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत.
या निवडणुकांसाठी चार आठवड्यांमध्ये प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातदेखील केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली आहे. प्रभाग रचनेची माहिती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला दिल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून या आठवड्यात प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाला सादर केली जाण्याची शक्यता आहे.
न्यायालयाने मागच्या महिन्यात राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने राज्य सरकारला चार आठवड्यात आधीसूचना जारी करण्यासही सांगितले होते.त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया करण्यास सुरूवात केली आहे. प्रभाग रचनेचे अधिकार महाविकास आघाडीच्या काळात सरकारने स्वत:कडे घेतले होते. आता प्रभाग रचना पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.
एक लाख ईव्हीएमची आवश्यकता
या निवडणुकांसाठी तब्बल एक लाख 'ईव्हीएम' यंत्रांची आवश्यकता असल्यानं या निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. कारण, आयोगाकडे सध्या 64 हजार 'ईव्हीएम' उपलब्ध आहेत. त्यामुळे उर्वरित 'ईव्हीएम'साठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येणार आहे.
निवडणुका होणाऱ्या महानरगपालिका
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई- विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी.
या जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा.