| मुंबई | प्रतिनिधी |
बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून, आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यात काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात 40 अंशांपर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा व खान्देशात कमाल तापमान 35 ते 40 अंशामध्ये राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे. कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकर्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
रायगडमध्ये पावसाची शक्यता
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढचे 48 तास रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 2 ते 4 जूनदरम्यान या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहील. पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये 1 ते 4 जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.