कुलाबा-रायगड लोकसभा मतदारसंघात 17 लढती

सहा वेळा शेकापची बाजी

| रायगड | खास प्रतिनिधी |

सुरुवातीचा कुलाबा आणि आताच्या रायगड लोकसभा मतदारसंघासाठी 17 वेळा लढत झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेकाप आणि काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच सलग 14 वेळा लढत झाली. असून त्यामध्ये आठ वेळा काँग्रेस आणि सहा वेळा शेकापचा उमेदवार विजयी झाला आहे. 2009 आणि 2014 साली शिवसेनेकडे असणारा हा मतदार संघ 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापच्या मदतीने आपल्याकडे घेतला होता.

रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवातीला शेकाप आणि काँग्रेस असे दोनच प्रमुख पक्ष होते. त्यांच्यामध्येच तुल्यबळ लढत झाली आहे. या कालावधीत प्रत्येक कार्यकर्ता हा आपापल्या पक्षासाठी कायम तत्पर होता. दोन्ही पक्षांमध्ये कमालीची खुन्नस होती. काही निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची डोकी देखील फुटली आहेत. पोलीस ठाण्यात राजकीय गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल होत असत. आज राजकीय परिस्थिती बदलली आहे.

1952 साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सी.डी.देशमुख (1,12,823) निवडून आले होते. देशमुख हे देशाचे पहिले अर्थमंत्री होते. त्यांनी शेकापचे राजाराम राऊत (70,785) यांचा पराभव केला होता. 1957 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेकापने मागील पराभवाचे उट्टे काढले होते. शेकापचे राजाराम राऊत (1,21,033) यांनी काँग्रेसच्या दत्तात्रेय कुंटे (57,558) यांचा पराभव केला होता.

1962 साली काँग्रेसचे भास्कर दिघे (98,680) विजयी झाले, त्यांनी शेकापचे राजाराम राऊत (69,638) यांना पराभूत केले होते. 1967 साली झालेल्या निवडणूकीत शेकापचे डि.के.कुंटे (1,64,468) यांनी काँग्रेसचे व्ही.एस. रणदिवे (1,29,656) यांना पराभवाची चव चाखालया लावली होती. 1971 साली काँग्रेसचे शंकर सावंत (1,28,082) विजयी झाले होते, त्यांनी शेकापच्या दत्ता पाटील (81,883) यांचा पराभव केला होता.

1977 साली शेकापचे दिनकर पाटील (1,99,463) यांनी काँग्रेसच्या शंकर सावंताचा (1,46,142) पराभव केला होता. 1980 साली ए.टी. पाटील हे काँग्रेसच्या तिकीटावर लढले होते. पाटील यांनी 1,60,524 विजयी मते मिळवली होती. त्यांनी शेकापच्या दिनकर पाटील यांना धुळ चारली होती. दिनकर पाटील यांना 1,11,104 मते मिळाली होती. दत्ता खानविलकर हे जनता पार्टीकडून निवडणुकीत उभे होते. त्यांना 87,614 मते मिळाली होती.

1984 साली शेकापचे डि.बी. पाटील यांना 2,11,194 मते मिळाली होती, तर काँग्रेसचे अंतुले यांनी काँग्रेसबरोबर फारकत घेत तराजु या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांना दुसर्‍या क्रमांकाची 1,73,270 मते मिळाली होती, तर काँग्रेसचे ए.टी.पाटील यांना 63,032 मतांवर समाधान मानावे लागले होते.

1991 सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे ए.आर.अंतुले हे 2,19,639 मते मिळवत ते विजयी झाले होते. शेकापचे दत्ता पाटील यांना 1,79,933 मते मिळाली होती, तर शिवसेनेचे सतिश प्रधान हे 96,880 मते मिळवत तिसर्‍या स्थानी राहिले होते. 1996 साली पुन्हा काँग्रेसचे ए. आर. अंतुले (2,13,187) हे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या अनंत तरे (2,09,180) यांचा पराभव केला, शेकापचे दत्ता पाटील (1,84,464) हे तिसर्‍या स्थानी राहिले होते. 1998 साली मात्र शेकापने पराभवाचा बदला घेतला. शेकापचे रामशेठ ठाकूर यांना 2,48,353 मते मिळाली आणि ते विजयी झाले. काँग्रेसच्या ए. आर. अंतुले यांना 2,39,227, तर शिवसेनेच्या अनंत तरे यांना 2,08,459 मते मिळाली ते तिसर्‍या स्थानी राहिले होते. त्यानंतर 1999 साली वाजपेयी सरकार अल्पमतात आल्याने गडगडले होते. 1999 साली पुन्हा निवडणुका लागल्या त्यामध्ये पुन्हा शेकापचे रामशेठ ठाकूर (2,74,361) यांनी बाजी मारली होती. शिवसेनेचे डी.बी. पाटील (2,31,264 ), तर काँग्रेसच्या पुष्पा साबळे यांना 1,48,146 मते मिळाली होती.

2004 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या ए. आर. अंतुले यांनी कमबॅक केले. त्यांनी 3,12,225 मते मिळवत विजयी झाले होते. शेकापचे विवेक पाटील यांना 2,80,355 मते मिळाली, तर शिवसेनेचे शाम सावंत यांना 1,64,242 मते मिळाली होती. 2009 साली शिवसेनेच्या अनंत गीते (4,13,542 ) यांनी काँग्रेसच्या ए.आर.अंतुले (2,67,025 ) यांचा पराभव केला. 2014 साली पुन्हा शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले. गीतेंना 3,96,178 मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांना 3,94,068 मते मिळाली त्यामध्ये तटकरेंचा पराभव झाला. शेकापचे रमेश कदम यांना 1,29,730 मते मिळाली होती. 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांना 4,86,968 मते मिळाली त्यामध्ये ते विजयी झाले, तर अनंत गीते यांना 4,55,530 मते मिळाली होती.

Exit mobile version