नागावमधील पाणी प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी
योग्य ती उपाययोजना करण्याबाबत कार्यकारी अभियंता यांचे आश्वासन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नागावमधील अनेक गावांना मुबलक पाणीपुरवठा होत नाही. तरीदेखील त्यांना पाणीपट्टी आकारण्यात आली आहे. नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी आक्रमक होत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. कार्यकारी अभियंता सरादे यांचे बुधवारी (दि.17) दुुपारी कार्यालय गाठले. पाणी प्रश्नाबाबत त्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी योग्य उपाययोजना कराव्यात असे सांगण्यात आले. हर्षदा मयेकर यांच्या मागणीची दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता सरोदे यांनी दिले.
अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत आहे. गावांमधील अनेक भागांमध्ये पाणी उपलब्ध होत नाही. काही ठिकाणी अत्यल्प दाबाने व अपूऱ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने नागाव महत्वाचे ठिकाण आहे. बंदरासह पाल्हे गावातही पाण्याची टंचाई आहे. शास्त्रीनगरमधील गावांमध्ये पाणीच पोहचत नाही. पिण्याच्या पाण्यासह इतर आवश्यक वापरासाठी मोठ्या अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना खासगी टँकर, इतर पर्यायी साधनांचा वापर करून अतिरिक्त आर्थिक भार पाण्यासाठी सहन करावा लागत आहे.
नागाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या गावांमधील पाण्याच्या प्रश्नांबाबत अनेकवेळा ग्रामपंचायतीमार्फत ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह संबधित प्रशासनाला लेखी पत्र दिले आहे. गावांमधील पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली आहे. पाणी टंचाई गाव घोषित करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. मात्र आजपर्यंत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून या समस्येवर ठोस व कायम स्वरुपी उपाययोजना झालेल्या दिसून आल्या नाहीत.
नागावमधील नागरिकांना नियमीत व पुरेसा पाणी पुरवठा होत नसताना प्रति घर दोन हजार दोनशे रुपये वार्षिक पाणी पट्टी आकारण्यात येत आहे. पाणी मिळत नसताना कोणत्या निकषांवर पाणी पट्टी आकारण्यात आली आहे, असा संतप्त सवाल व्यक्त करण्यात आला आहे. नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांच्यासह नागाव शास्त्रीनगरमधील महिलांनी, रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरोदे यांची बुधवारी(दि.17) दुपारी भेट घेतली. नागाव हे वेगाने विकसित होणारे पर्यटन गाव आहे. दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची गरज आणखी वाढणार आहे. सध्याच्या परिस्थितीतच पाण्याची गंभीर समस्या आहे. ही समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाश्वत व सक्षम पाणी पुरवठा व्यवस्था उभारणे अत्यंत आवश्यक आहे. ही बाब सरपंच हर्षदा मयेकर यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
अतिरिक्त जलस्त्रोत उपलब्ध करून शाश्वत आणि दिर्घकालीन पाणीपुरवठा आराखडा तयार करण्यात यावा. विद्यमान पाणी पुरवठा योजनेची तांत्रिक पाहणी करून कमी दाब, गळती व इतर त्रुटी तात्काळ दुर करण्यात याव्यात अशी मागणी करीत या विषयांकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, असे लेखी पत्र देण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता सरोदे यांनी योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिली.
पाण्याची समस्या गंभीर आहे. नागावमधील बंदर, पाल्हे विभागात पाणी पोहचत नाही तरीदेखील पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. पाणी पट्टीत सवलत मिळावी ही मागणी आहे. पाण्याचा प्रश्न उदभवला आहे. योग्य पध्दतीने पुरवठा करण्याचे नियोजन संबंधित विभागाने करावे ही मागणी आहे. त्यासाठी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन नागावमधील पाणी प्रश्नाची सोडवणुक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाणीपट्टी आकारण्याबाबत सवलतीबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
– हर्षदा मयेकर, सरपंच, नागाव







