1691 पैकी 1358 जणांनी शस्त्र केली जमा
| रायगड | खास प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रायगड पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी एक हजार 691 अग्नीशस्त्र परवानाधारकांकडील एक हजार 358 शस्त्रे जमा केली असून, 182 जणांनी अद्याप ती जमा केलेली नाहीत. निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील अधिकृत शस्त्र परवानाधारकांनी शस्त्र जमा करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले होते. हा आदेश 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे. सदरची आकेडवारी ही 4 एप्रिल 2024 पर्यंतची आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी, एमपीडीए व प्रतिबंधात्मक कारवाया, हिस्ट्रीशीटरवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केले आहे. त्याशिवाय निवडणुकीत प्रामुख्याने परवानाधारक शस्त्र जप्त करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हद्दीतील सध्या 1691 शस्त्र परवानाधारक आहेत, पैकी 1358 जणांनी आपापली शस्त्रे संबंधीत पोलिस ठाण्यात जमा केली आहेत, तर 182 जणांनी अद्याप जमा केलेली नाहीत.
मावळ लोकसभा पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये 780 शस्त्र परवानाधारक आहेत. पैकी 423 जणांनी आपल्याकडील शस्त्रे जमा केली असून 42 परवानाधारकांनी अद्याप शस्त्र पोलीसांकडे जमा केली नाहीत. जिल्ह्यात 80 टक्के शस्त्र परवानाधारक हे उद्योग, व्यापार, राजकीय क्षेत्रातील असून जीवितास धोका, वैयक्तिक सुरक्षेच्या कारणातून परवाने घेतले आहेत त्यांची संख्या 1288 आहे, त्यांच्याकडे 1355 शस्त्रे आहेत. 22 खेळाडूंकडे 68 शस्त्र आहेत. 175 शेतकर्यांकडे तेवढीच शस्त्रे आहेत. बँकेच्या 33 सुरक्षा रक्षकांकडे 46 बंदुका आहेत, तसेच 10 संस्थांकडे 21 शस्त्रे आहेत. 16 सुरक्षा रक्षकांकडे 26 शस्त्रे आहेत.
शस्त्राचा निवडणुकीदरम्यान गैरवापर होऊ नये, या हेतूने निवडणूकीच्या कालावधीत शस्त्र जमा करणे बंधनकारक असते. मात्र, काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने सरसकट शस्त्र गोळा न करण्याचा निकाल दिला होता. यंदा निवडणूक आयोगाने देखील याबाबतचे आदेश मवाळ केल्याने यंदा मोठा बदल झाला. पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती कोणाचे शस्त्र जमा करणे बंधनकारक आहे, कोणाला सूट द्यायची याविषयी निर्णय घेते. यासाठी समिती कारणे पाहून निर्णय देते. बँक, सुरक्षारक्षक, खेळाडूंना या नियमातून सूट असते.