। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत मधील चाहुचीवाडी येथील विहिरीध्ये एका 22 वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या करून स्वतःला संपवून टाकले. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील पाटगाव येथील राहणारा दशरथ रघुनाथ बनसोडे हा 22 वर्षीय तरुण सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता. 12 ऑक्टोबर रोजी त्याचा पगार झाला होता आणि त्याने पगाराच्या पैशातून घरातील किराणा साहित्य खरेदी करून नेले होते. सायंकाळी साडे पाच वाजता हा तरुण घरातून बाहेर निघाला, त्यावेळी मोबाईल, पाकीट आणि बाईक न घेता पायी चालत गावाबाहेर आला. पाटगाव गाव हे कर्जत तालुका आणि रायगड जिल्हा हद्दीपासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर आहे. पुढे कर्जत तालुका हद्दीत मुरबाड-कर्जत राज्यमार्ग रस्त्याने चालत चालत हा तरुण चाहुचीवाडी येथील उतारावर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीजवळ आला. सायंकाळ होत आल्याने अंधार पडत असताना आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून त्या तरुणाने विहिरीत उडी मारून स्वतःला संपवून टाकले.
गुरुवारी सकाळी काही आदिवासी त्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी आले असता त्यांना कोणाचे प्रेत विहिरीतील पाण्यावर तरंगले असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्या तरुणांनी कळंब येथे जाऊन पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. पोलीसांनी स्थानिक आदिवासी तरुणांच्या मदतीने त्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आणि मृतदेहाची ओळख पटावी यासाठी मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. ते फोटो बघून पाटगाव येथील रघुनाथ बनसोडे आणि त्यांचे कुटुंबीय हे अर्ध्या तासात चाहुचीवाडी येथे आले.त्यांनी तो मृतदेह दशरथ बनसोडे याचाच असल्याचे मान्य केले आहे.