24 हजार शेतकर्‍यांनी उतरविला पीक विमा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

आपत्कालीन परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्या शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ दिला जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील 24 हजार 604 शेतकर्‍यांनी एक रुपया भरून पीक विमा उतरविला आहे. 11 हजार 579 हेक्टर क्षेत्रासाठी हा विमा उतरविण्यास आला असून, यामध्ये 31 जुलैपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पीक विम्यासाठी अर्ज भरावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.

पेरणी न होणे, पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरिता विमा संरक्षण दिले जाणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये चोलामंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यासाठी भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 51 हजार 760 रुपये असून, नाचणी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये आहे. ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी लागणार आहे. या योजनेंतर्गत भातासाठी केवळ 1 रुपयात जवळजवळ 50 हजार रुपये पीक विमा संरक्षणाचा लाभ दिला जाणार आहे.

रायगड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जाणार आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 करिता शेतकरी नोंदणीकरिता 15 जुलै अंतिम तारीख होती. या तारखेपर्यंत जिल्ह्यातील 11 हजार 579 हेक्टर क्षेत्रासाठी 24 हजार 604 शेतकर्‍यांनी एक रुपयात पीक विमा शेतकरी नोंदणी केली आहे. आता पीक विमा उतरविण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी 60 हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे पंधरा दिवसांत 61 हजार शेतकरी पीक विमा नोंदणी करतील, असा विश्‍वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या योजनेत शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले.

Exit mobile version