लोक अदालतीमध्ये 24,476 प्रकरणे निकाली

18 कोटी 68 लाख 63 हजार 31 रुपयांची वसुली

| अलिबाग | वार्ताहर |

दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने शनिवारी लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली. वादपूर्व व दाखल अशी एकूण 24 हजार 476 प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन दि.9 रोजी करण्यात आले. त्यामध्ये 82 हजार 465 वादपूर्व प्रकरणे व 12 हजार 28 प्रलंबित अशी एकूण 94 हजार 493 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी 23 हजार 87 वादपूर्व प्रकरणे व 1 हजार 389 प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने मिटवून निकाली काढण्यात आली. अशी एकूण 24,476 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून त्याद्वारे पक्षकारांना एकूण 18,68,63,031 रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे.

रायगड जिल्हयातील विविध न्यायालयांत 27 लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालत्तीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करुनसुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली. लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड पोलीस अधिक्षक, रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. राजंदेकर व न्यायाधीश तथा सचिव अमोल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

नऊ जोडप्यांचा संसार जुळला
रायगड जिल्ह्यातील लोकन्यायालयात 9 जोडप्यांचा सामंजस्याने वाद मिटवण्यात आला. त्यात पालीमधील एक, रोहामधील चार, महाडमधील तीन व पेणमधील एक जोडप्यांचा समावेश असून त्यांचा संसार सुरळीत झाला आहे.

मोटार अपघात प्रकरणांमध्ये भरपाई
जिल्हयामध्ये एकूण 76 मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना 4 कोटी 23 लाख 27 हजार रुपये इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
Exit mobile version