निलंबित कर्मचार्यांचा सहकार्यांनी केला सत्कार
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.च्या संपाचा तिढा कायम असुन त्यात तोडगा काहीच निघत नाहीये. संपात सहभागी असलेल्या कर्मचार्यांवर टप्प्याटप्प्याने निलंबनाची कारवाई सुरु आहे. श्रीवर्धन आगारात एकुण 231 कर्मचारी सेवेत असुन 157 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपात सहभागी झालेल्या श्रीवर्धन आगारातील 11 चालक, 8 वाहक, 7 कार्यशाळा कर्मचारी तर 1 प्रशासकीय कर्मचारी असे एकूण 27 कर्मचार्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचार्यांचा सहकार्याकडून पुष्पगुच्छ व हार घालून सत्कार करण्यात आला.
निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या आपल्या सहकार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार करण्यात आला, असे आगारातील संपात सहभागी असलेल्या कर्मचार्यांनी सांगितले. त्याच वेळेला आमच्या बांधवांना निलंबित केले आहे आम्हालाही निलंबित करावे, 42 बांधवांच बलिदान आम्ही वाया जाऊन देणार नाही, राज्यशासनात एसटीचे विलिनीकरण झालेच पाहिजे व लोकशाहीने दिलेला भत्ता व वेतन आम्हांला मिळालेच पाहिजे अशी प्रतिक्रिया कर्मचार्यांनी दिली.