मृत कामगाराच्या कुटुबियांना एक्सेलकडून 27 लाखाची भरपाई

धैर्यशील पाटील यांचा कंपनीला दणका

| रोहा | प्रतिनिधी |

कंपनीत काम करताना भाजून मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबियाना 27 लाखांची नुकसान भरपाई मिळवून देण्यात माजी आ.धैर्यशील पाटील हे यशस्वी ठरले आहेत.

एक्सेल कंपनीत कार्यरत असणारे रामचंद्र उमाजी ढमाल रा. सांगडे 10 सप्टेंबर रोजी कंपनीत झालेल्या अपघातात अंगावर केमिकल सांडल्याने भाजले होते. त्यांच्यावर ऐरोली येथील रुग्णालयात मागील महिनाभर उपचार सुरू होते. परंतु 9 ऑक्टोबर रोजी त्यांची झुंज संपली.

सदर घटना धैर्यशील पाटील यांना समजताच त्यांनी ऐरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन मृत व्यक्तीच्या परिवाराचे सांत्वन केले. याबाबत कंपनी प्रशासनाकडून अत्यंत तुटपुंजी रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात येत होती. यावरून धैर्यशील पाटील यांनी कंपनी प्रशासनाला धारेवर धरले. कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका 33 वर्षीय इसमाचा मृत्यू होतो. सदर व्यक्तीच्या उत्पन्नावर त्याचे आई, वडील, पत्नी व दोन लहान मुले अवलंबून आहेत. अशावेळी कंपनी प्रशासनाकडून तुटपुंजी भरपाई देण्यात येत होती. हा प्रकार अतिशय गंभीर व संतापजनक होता. यावरून धैर्यशील पाटील व प्रशासनाचे अधिकारी यांच्यात खडाजंगी झाली. अखेर मृत व्यक्तीच्या परिवाराला 27 लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्याचे ठरविण्यात आले.

याप्रसंगी चर्चा करताना पाटील यांच्याशी कंपनी प्रशासनाच्या वतीने तिवारी मॅडम, डॉ. शील, हेडेकर, जोशी व देशपांडे तसेच शेकाप रोहा तालुका खजिनदार परशुराम वाघमारे, विनोद पाशीलकर,अनंता देशमुख तसेच ढमाल यांचे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. एक्सेल कंपनीत यापूर्वी देखील अनेक दुर्घटना घडल्या असून पिडीत परिवाराला पाटील यांच्या दणक्यामुळे न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Exit mobile version