लालपरीच्या उत्पन्नात 30 टक्क्यांनी वाढ

प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत राज्य परिवहन महामंडळाचे 40 टक्के कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे आठ आगारांतून एसटीच्या दिवसाला सरासरी 450 फेर्‍या होत आहेत. शिवाय, प्रवाशांचा प्रतिसाददेखील चांगला मिळत आहे. परिणामी, मागील महिन्यात जिल्ह्यात एसटीचे दिवसाला सात लाख रुपये असणारे उत्पन्न या महिन्यापासून दिवसाला तब्बल दहा लाखांवर गेले आहे.
मागील तीन महिन्यांपासून राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. यातील काही कर्मचारी पुन्हा कामावर परतत आहेत. यामुळे जिल्ह्यातदेखील परिवहन मंडळाच्या गाड्या काही प्रमाणात धावताना दिसत आहेत. गाड्यांच्या फेर्‍या हळूहळू वाढत असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने खूप सोयीचे होत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी स्थानकात व रस्त्यावर एसटीची वाट पाहताना दिसत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील भरून जात आहेत. शिवाय, कमी पल्ल्याच्या गाड्यांमुळे खेड्यापाड्यातील लोकांची काही अंशी सोय झाली आहे. अनेक लोक स्थानिक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप व फेसबुकवर गाड्यांचे वेळापत्रक आवर्जून शेअर करत आहेत. ज्यामुळे प्रवासी त्यावेळेस स्थानकात दाखल होतात. शिवाय, त्यांना गाड्यांची माहितीदेखील मिळते. अतिरिक्त खर्च करून खासगी वाहनांनी जाणे वाचते. परिणामी, प्रवाशांची वेळ व पैसेदेखील वाचत आहेत, असे एका प्रवाशाने सांगितले.

जिल्ह्यातील आगार
रायगड जिल्ह्यात कर्जत, पेण, अलिबाग, मुरुड, रोहा, माणगाव, महाड व श्रीवर्धन असे एकूण आठ आगार आहेत.

कर्मचार्‍यांची स्थिती
एसटीच्या संपापूर्वी या आठही आगारांत जवळपास 2252 कर्मचारी होते. ज्यामध्ये वाहक, चालक, प्रशासन, अधिकारी, लेखा, कारकून व यांत्रिक विभाग आदी विविध कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यातील जवळपास 850 ते 900 कर्मचारी आजघडीला कामावर परतले आहेत. यामध्ये जवळपास 250 वाहन चालक व वाहक आहेत.

गाड्या व फेर्‍या
आठ आगारांत सर्वसाधारणपणे 450 गाड्या आहेत. त्यातील 350 गाड्या संपाआधी वापरल्या जात होत्या. सध्या संपामुळे यातील 100 गाड्या वापरल्या जात आहेत. आणि आठ आगारांतून रोजच्या तब्बल 450 फेर्‍या होत आहेत.

उत्पन्नात वाढ
मागील महिन्या पर्यंत या 8 आगरांतून दिवसाला एकूण 7 लाख उत्पन्न मिळत होते. मात्र या महिन्यात उत्पन्न दिवसाला 10 लाखांवर गेले आहे. असाच प्रतिसाद राहिल्यास आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

अजूनही काही कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. परिवहन मंत्र्यांनी आत्ता जे शेवटचे आवाहन केले तेव्हा जवळपास 100 कर्मचारी हजर झाले आहेत. उपलब्ध संसाधने व कर्मचार्‍यांद्वारे परिवहन सेवा सुरू आहे. प्रवाशांचा प्रतिसाद देखील खूप चांगला. – अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, परिवहन महामंडळ, पेण-रायगड

Exit mobile version