बिंदिसा सोनारकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशने ”33व्या किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेकरीता बुधवारी(दि.27) आपला संघ जाहीर केला. नाशिक शहरच्या बिंदिसा सोनारकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली, तर सांगलीच्या श्रावणी भोसलेकडे उपसंघनायिकेची जबाबदारी सोपविण्यात आली. यंदा अंतिम विजयी ठरलेल्या जालन्याच्या 3 मुलींचा या संघात समावेश करण्यात आला आहे. पटणा, बिहार येथील पाटली पुत्र क्रीडा संकुलात दिनांक 31 मार्च ते 3 एप्रिल 2024 या कालावधीत या स्पर्धा होतील. पुणे येथे नुकत्याच झालेल्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून 40 जणींची किशोरी गटाच्या सराव शिबिरा करीता निवड करण्यात आली होती. त्यांचा सराव शिबिर महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या सहकार्याने त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान यांच्या यजमान पदा खाली नेवासा येथे घेण्यात आला. या 40 जणींमधून स्पर्धेकरीता 12 जणांचा संघ निवडण्यात आला.
हा निवडण्यात आलेला संघ गुरुवार (दि.28) मार्च रोजी दुपारी 12-15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून समस्तीपुर सुपर फास्ट एक्स्प्रेसने स्पर्धेकरीता रवाना होईल. संघ शुक्रवार दिनांक 29मार्च रोजी सायं. 5-10च्या सुमारास पाटली पुत्र येथे पोहचेल. हे सराव शिबीर यशस्वी करण्याकरिता त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील, प्राचार्य सोपानराव काळे, प्रसिद्ध उद्योजक संभाजी काळे यांनी अथक परिश्रम घेतले. निवडण्यात आलेला संघ किशोरी गटाचा संघ :- 1) बिंदिसा सोनार(संघनायक) – नाशिक शहर, 2) श्रावणी भोसले(उपसंघनायिका) – सांगली, 3)मोनिका पवार – जालना, 4)राणी भुजंग – जालना, 5)साक्षी जाधव – परभणी, 6)भाग्यश्री गायकवाड – जालना, 7)तनिष्का बोरकर – पिंपरी-चिंचवड, 8)समीक्षा पाटील – नंदुरबार, 9)मुग्धा शिर्के – रत्नागिरी, 10)संस्कृती सुतार – सातारा, 11)दृष्टी कुंभार – मुंबई शहर पश्चिम, 12)आरती शेळके – ठाणे.
प्रशिक्षक:- ज्ञानेश्वर ठोंबरे – परभणी, सहा.प्रशिक्षक:- अशोक पानकडे – अहमदनगर.
व्यवस्थापिका:- सुवर्णा लोखंडे – अहमदनगर.