गुजरातमध्ये तब्बल 350 किलो ड्रग्ज जप्त

मुंब्र्यामधल्या भाजी विक्रेत्याला अटक
। मुंबई । वृत्तसंस्था ।
गुजरातमधील द्वारकामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमध्ये तब्बल 350 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले असुन या प्रकरणात मुंब्र्यामधल्या एका भाजी विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे तब्बल 17 किलो मेफेड्रोन आणि हेरोईन सापडलं आहे. हा आरोपी महाराष्ट्राचा असून मुंब्र्याचा रहिवाशी आहे. विशेष म्हणजे हा भाजीविक्रेता आहे. देवभूमी द्वारका पोलिसांनी ही करवाई केली असून आरोपीकडे सापडलेल्या ड्रग्जची किंमत 88 कोटी 25 लाख इतकी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 19 पाकिटं जप्त केली आहेत. याशिवाय अजून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे 47 पाकिटं सापडली.
राजकोट रेंजचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीप मिळाल्यानंतर स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप आणि स्थानिक गुन्हे शाखेने एकत्र कारवाई करत शेहजाद घोषी या व्यक्तीला आराधना धाम येथून ताब्यात घेतलं. त्याच्या बॅगेत एकूण 19 पाकिटं सापडली. यामध्ये 11 किलो हेरोईन आणि 6 किलो मेफेड्रोन होतं. याची एकूण किंमत 88 कोटी 25 लाख इतकी आहे, अशी माहिती संदीप सिंह यांनी पत्रकार परिषदेददरम्यान दिली. गुजरातमध्ये गेल्या दोन महिन्यात करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.

Exit mobile version