| रायगड | खास प्रतिनिधी |
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात जिल्हास्तरावर रायगड जिल्हा परिषदेच्या कर्जत तालुक्यातील हेदवली शाळेने पहिला क्रमांक पटकवला आहे. तर, खासगी शाळांमध्ये पनवेल तालुक्यातील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने बाजी मारली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. लवकरच जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावरील निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सहा शाळांनी एकूण 38 लाखांच्या बक्षिसांची घसघशीत रक्कम खिशात घातली आहेत.
राज्यातील शैक्षणिक विभागातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय निकालांची घोषणा होणे बाकी आहे. पुढील दोन दिवसांमध्ये याची घोषणा होणार आहे. मात्र, कृषीवलला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी एक अशा 15 सरकारी आणि 15 खासगी शाळांची निवड करण्यात आली. त्यानंतर या 30 शाळांमधून सरकारी आणि खासगी शाळांचे प्रत्येकी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले. अशा सहा शाळांची निवड जिल्ह्यातील निवड समितीने केली याकडे सूत्रांनी लक्ष वेधले. यातील प्रत्येकी दोन शाळा जिल्ह्यातून विभागस्तरावरील स्पर्धेसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कर्जत-हेदवली जिल्हा परिषद शाळा (प्रथम क्रमांक), रोहा-उर्दु नगरपालिका शाळा (द्वितीय क्रमांक) या सरकारी शाळांसह पनवेल- रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (प्रथम क्रमांक), पाली-सुधागड हायस्कूल (द्वितीय क्रमांक) या खासगी शाळांचा समावेश आहे.
या अभियानांतर्गत शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम आदींची तपासणी तज्ज्ञ समितीच्यावतीने करण्यात आली होती.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता पुढील दोन-तीन दिवसांमध्ये निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. तशा सूचना वरिष्ठ स्तरावरुन देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तालुकास्तरावर पहिल्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या शाळांनी अनुक्रमे तीन, दोन आणि एक लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त केले आहे. आता विभागीय स्तरावर पहिल्या तीन क्रमांकांना 21 लाख, 11 लाख आणि 7 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
सरकारी शाळांची नावे कर्जत- हेदवली जिल्हा परिषद शाळा (प्रथम क्रमांक, 11 लाख रुपये) रोहा- उर्दु नगर पालिका शाळा (द्वितीय क्रमांक, 5 लाख रुपये) अलिबाग- पेझारी जिल्हा परिषद शाळा (तृतीय क्रमांक, 3 लाख रुपये)
खासगी शाळांची नावे पनवेल- रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (प्रथम क्रमांक, 11 लाख रुपये) पाली- सुधागड हायस्कूल (द्वितीय क्रमांक, 5 लाख रुपये) महाड-वरंध- शाळा (तृतीय क्रमांक, 3 लाख रुपये)