राजीनाम्यांनी पेटला बंडाचा वणवा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

महायुतीचा फॉर्म्युला की शिवसेनेचा बळी?
जागा गेली, पदं गेली, रायगडमध्ये शिवसेनेचा संताप उसळला

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगडमधील विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाने महायुती जिंकली असली, तरी या विजयाची सर्वात मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागत असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. विधानसभा निवडणुकीप्रसंगी खा. सुनील तटकरे यांच्यावर चिखलफेक करणारे, राजकारणाचा दर्जा खाली नेणारे, संस्कार बाजूला ठेवून आरोप करणारे कर्जतचे आ. महेंद्र थोरवे यांनी त्याच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनिकेत तटकरेंच्या गळ्यात गळे घातल्याचे पाहून अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पारड्यात जागा टाकून शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना डावलण्यात आल्याचा आरोप होत असून, त्याचे पडसाद आता थेट राजीनाम्यांच्या रूपाने उमटू लागले आहेत.

रायगडच्या विधान परिषदेच्या जागेसाठी महायुतीमध्ये अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. शिवसैनिकांना ही जागा सेनेच्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अखेर ही जागा राष्ट्रवादीकडे गेली आणि खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर शिवसेनेत दडपून ठेवलेला संताप उघडपणे बाहेर पडू लागला आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, महायुतीच्या नावाखाली शिवसेनेचा राजकीय बळी दिला गेला. याच नाराजीचा पहिला मोठा फटका आता संघटनेला बसला असून, खालापूरचे माजी तालुकाध्यक्ष संदेश पाटील यांच्यासह तब्बल 38 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत पक्षनेतृत्वालाच थेट आव्हान दिले आहे. आ. महेंद्र थोरवे यांनी अनिकेत तटकरे यांना दिलेल्या सहकार्यामुळे शिवसैनिकांमधील असंतोष अधिक भडकला आणि त्यातूनच राजीनाम्यांचा स्फोट झाल्याचे बोलले जात आहे.

‌‘असली सत्ता आम्हाला नकोय‌’
राजीनाम्यानंतर संदेश पाटील यांनी संतप्त भावना व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. ‌‘सत्तेत राहूनही जर अपमान, डावलणं आणि नाचक्कीच सहन करायची असेल, तर अशी सत्ता आम्हाला नको. आम्हाला डिवचण्याचं काम झालं आहे. पदापेक्षा स्वाभिमान मोठा‌’, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, राष्ट्रवादीला रायगडची जागा देऊन शिवसेनेला पालकमंत्रीपदाचे आश्वासन दिले जाईल, अशी चर्चा असली तरी स्थानिक शिवसैनिकांना ते मान्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Exit mobile version