| सुकेळी | वार्ताहर |
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात नागोठणेजवळच असलेल्या जि.प.शाळा सुकेळी येथील शाळेने संपुर्ण रोहा तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे व ग्रामस्थांच्या लोकसहभागामुळे शाळेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे जिल्ह्यासह रोहा तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने शाळेत शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हा उपक्रम अत्यंत प्रभावीपणे संपूर्ण राज्यात राबविण्यात आला. यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील सुकेळी येथील शाळेने अत्यंत प्रभावीपणे कामगीरी करीत मुल्यांकनातील प्रत्येक मुद्द्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी शाळेचे मुख्याध्यापक सुधिर शेळके व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळेच शाळेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे रायगड जिल्ह्यात एका ग्रामीण विभागातील सुकेळी शाळेला या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविण्यात यश संपादन झाले.
सुकेळी शाळेच्या या यशामागे केंद्र प्रमुख हिरामण दोरे, शाळेचे मुख्याध्यापक सुधिर शेळके, उपशिक्षिका रोहीणी तावडे, वांगणी केंद्रातील शिक्षकवृंद, तसेच नेहमीच शाळेला मदत करणारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, ऐनघर ग्रामपंचायत सदस्य, पालकवर्ग, महिलावर्ग तसेच, ग्रामस्थ मंडळ सुकेळी अशा सर्वांचाच या यशामागे मोलाचा वाटा असल्यामुळेच हे यश मिळाल्याचे मुख्याध्यापक सुधिर शेळके यांनी सांगितले. शाळेच्या या यशाबद्दल रोहा तालुक्यातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.