पोलादपुरात दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील सुतारवाडी परिसरात दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमनं ही माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, पाच लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तर एएनआयच्या वृत्तानुसार, महाड तालुक्यात दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

महाड तालुक्यातील कलाई या गावात दरड कोसळल्याची माहिती एएनआयनं दिलीय. या दुर्घटनेमुळे किती नुकसान झालंय, हे अद्याप कळू शकलेलं नाही. एएनआय या वृत्तसंस्थेनं रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबत माहिती दिल्याचे सांगितले आहे.

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या माहितीनुसार, एनडीआरएफच्या पथकाला या घटनेबाबत माहिती दिली आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात महाड तालुक्यात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास प्रशासनाला अडथळा येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

दुसरीकडे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे मदतची मागणी केलीय. महाडमध्ये पावसाच्या पाण्यात अडकलेल्यांच्या मदतीसाठी लष्कराच्या मदतीची मागणी करण्यात आलीय.मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेत. त्यामुळे NDRF च्या पथकांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा येतोय, अशीही माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

Exit mobile version