। पनवेल । वार्ताहर ।
गुगलच्या माध्यमातून बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या 67 वर्षीय रिटायर्ड व्यक्तीला सायबर चोरट्याने 4.54 लाख रुपयांचा गंडा घातलेला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेले अशोक सक्सेना हे पनवेलमध्ये राहत असून त्यांना तक्का भागातील एसबीआय बँकेत काम त्यांनी गुगलवरुन एसबीआय बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान एका सायबर चोरट्याने सक्सेना यांना संपर्क साधून एसबीआय बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवत त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. यांनतर सायबर चोरट्याने सक्सेना यांना मोबाईल फोनवर युनो अॅपमध्ये तो सांगेल त्या पद्धतीने माहिती भरण्यास सांगितले. याचदरम्यान सायबर चोरट्याने सक्सेना यांच्या खात्यातून 4.54 लाख रुपये दुसर्या बँकेत वळती करुन घेतले. याबाबचा मेसेज सक्सेना यांच्या मोबाईलवर आल्यानंतर त्यांनी सायबर चोरट्याकडे याबाबत विचारणा केली. मात्र, त्याने थातुरमातूर उत्तर देऊन सक्सेना यांना गुंतवून ठेवले. यानंतर सायबर चोरट्याने सक्सेना यांच्या 5 लाखांची फिक्स डिपॉझिट मोडून त्यातील 3.75 लाख रुपये काढून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा मेसेज सक्सेना यांच्या मोबाईलवर आल्यानंतर पुन्हा त्यांनी सायबर चोरट्याकडे याबाबत विचारणा केली. याहीवेळी त्याने खोटे कारण सांगितल्यामुळे सक्सेना यांना संशय आल्यानंतर त्यांनी तत्काळ आपला फोन बंद केला. यानंतर सक्सेना यांनी नवी मुंबई सायबर पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केली आहे.






