। उत्तरकाशी । वृत्तसंस्था ।
उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्यात अनेक प्रकारचे अडथळेही समोर येत आहेत. आता बोगद्यावर उभ्या खोदकामालाही सुरुवात झाली असून 30 मीटरपेक्षा जास्त खोदकाम पूर्ण झाले आहे. त्याचवेळी, 48 मीटर वरून ड्रिलिंग दरम्यान, बोगद्याच्या आत टाकलेल्या पाईपमध्ये अडकलेल्या ऑगर मशीनला प्लाझ्मा कटरने कापून पूर्णपणे बाहेर काढण्यात आले आहे. आता या ड्रिलिंगमध्ये 48 मीटरच्या पुढे खोदकाम हाताने केले जाणार आहे. यासाठी 6 उंदीर खाण कामगार (रैट माइनर्स) सिल्क्यारा येथे पाचारण करण्यात आले आहे.
या खाण कामगारांना दिल्ली आणि अहमदाबादमध्ये अशा प्रकारचे काम करण्याचा अनुभव आहे. ते म्हणाले की, ‘आम्ही एकाच समाजाचे आहोत, आम्ही सर्वजण मजूर आहोत, बोगद्यात अडकलेलेही मजूर आहेत. आम्हाला त्या 41 कामगारांना बाहेर काढायचे आहे. आम्ही देखील कधीतरी असेच अडकू शकतो, तेव्हा ते देखील आम्हाला मदत करतील. तसेच, आम्हाला अशा कामाचा अनुभव आहे, आम्ही अनेक वर्षांपासून हे काम करत आहोत. आपण हे करू शकतो असा आत्मविश्वास आम्हाला आहे.
एकावेळी 6 ते 7 किलो मलबा बाहेर काढतील या कामाची माहिती देताना खाण कामगार म्हणाले की, पहिले दोन लोक पाईपलाईनमध्ये जातील, एक पुढे रस्ता बनवेल आणि दुसरा ट्रॉलीमध्ये मलबा भरेल. बाहेर उभे असलेले चार लोक पाईपच्या आतून मलबा असलेली ट्रॉली बाहेर काढतील. एका वेळी 6 ते 7 किलो मलबा बाहेर काढला जाईल. मग आतील दोन लोक थकल्यावर बाहेरून दोन लोक पाइपलाइनमध्ये जातील. त्याचप्रमाणे एक एक करून काम केले जाईल.
जेव्हा जागा फारच अरुंद असते आणि मोठी मशीन किंवा इतर ड्रिलिंग उपकरणे त्याठिकाणी नेणे शक्य नसते तेव्हा या तंत्राचा अवलंब केला जातो. यामध्ये मानव हाताने खोदतो. मानव एका छोट्या जागेत हळूहळू खोदकाम करत असल्याने त्याला उंदीर खाण काम (रैट माइनिंग) असे नाव देण्यात आले आहे. कोळसा खाणीमध्ये या पध्दतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. खासकरून ज्या ठिकाणी अवैध खोदकाम केले जाते त्या ठिकाणी या पध्दतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.