| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाच्या कालावधीत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात यंदा तब्बल 26 हजार 88 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती तसेच सात दिवसांच्या गणेशमूर्तींचा यात समावेश आहे.
महापालिकेच्या विसर्जन अहवालातून यंदाच्या गणेशोत्सवातील मूर्ती विसर्जनाची संपूर्ण आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये शाडू मातीच्या 7 हजार 726 मूर्ती, तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 18 हजार 362 मूर्तींचे विसर्जन झाले. शाडू मातीच्या मूर्तींपैकी 5 हजार 193 मूर्तींचे नैसर्गिक तलावांमध्ये, तर 2 हजार 533 मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. पीओपीच्या 14 हजार 710 मूर्ती नैसर्गिक तलावांमध्ये, तर 3 हजार 652 मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्या.
गणेशभक्तांची गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने शहरातील विविध नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था केली होती. विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. यंदाच्या गणेशोत्सवात निर्माल्य संकलनावरही विशेष भर देण्यात आला. महापालिका क्षेत्रात तब्बल 44.3 टन निर्माल्य संकलित करण्यात आले. यामध्ये फुले, हार तसेच अन्य पूजासाहित्याचा समावेश होता. नानासाहेब धर्माधिकारी संस्थेच्या माध्यमातूनही 9.5 टन निर्माल्य संकलित करण्यात आले. नागरिकांनी निर्माल्य थेट तलावात न टाकता उपलब्ध करून देण्यात आलेल्या संकलन केंद्रांमध्ये जमा केले. त्यामुळे जलस्रोतांमध्ये निर्माल्य जाण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत झाली. दरम्यान, एकूण विसर्जित मूर्तींच्या तुलनेत शाडूच्या मूर्तींची संख्या लक्षणीय असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींकडे नागरिकांचा वाढता कल असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे. मात्र, पीओपीच्या मूर्तींची संख्या अद्यापही मोठी असल्याने आगामी गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मूर्तींच्या वापराबाबत जनजागृती करण्याचे आव्हान कायम आहे. विसर्जनानंतर महापालिकेच्या माध्यमातून विविध विसर्जनस्थळांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नागरिकांच्या सहकार्यामुळे यंदाची विसर्जन प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे आणि त्याच्या सहकारी फार मोठी मेहनत घेतली.
पनवेलमध्ये 44.3 टन निर्माल्य संकलित
