नोकरी लावण्याच्या आमिषाने 44 जणांची फसवणूक

शैलजा दराडेंना जामीन मंजूर
| पुणे | वृत्तसंस्था |
शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने 44 जणांची तब्बल 5 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी जामीन मंजूर केला आहे. पुराव्यात छेडछाड करू नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये यासह विविध अटीशर्तींसह 75 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे. शैलजा दराडे यांनी रायगड जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम पहिले आहे.

उमेदवारांना शिक्षक, आरटीओ, तलाठी पदावर नोकरी लावू तसेच टीईटी उत्तीर्ण करून देवू असे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी शैलजा दराडे (रा. पाषाण) यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर सात ऑगस्टला शैलजा दराडे यांना अटक झाली. दराडे यांना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती.

शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी शैलजा दराडे या त्यांच्या भावामार्फत डी.एड. झालेल्यांकडून सुमारे 12 तर बी.एड. झालेल्यांकडून सुमारे 14 लाख रुपये घेत होत्या. या प्रकरणी त्यांना निलंबन करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून लावला होता.

Exit mobile version