पशुपालकांवर दुःखाचा डोंगर, ४८ जनावरे दगावल्याची स्थानिकांची माहिती

शवविच्छेदन अहवालांनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील पांगळोली येथील ४८ जनावरे दगावल्याची माहिती स्थानिकांनी गुरांच्या मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे तालुक्यातील पशुपालकांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

रोहा तालुक्यातील पांगळोली येथील पशुपालकांनी पशुसंवर्धन विभाग, रोहा यांना १७ जुलै २०२२ रोजी संपर्क साधुन गावातील जनावरे मृत होत असल्याबाबत माहिती दिली होती. आतापर्यंत एकूण ४८ जनावरे मृत झाली असल्याची माहिती स्थानिक पोलीस पाटील सुनिल कासार यांनी दिली आहे. ही माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी त्वरित दाखल झाले असता त्यांना प्रथमदर्शी घटनास्थळी ३ पशूंचे मृतदेह निदर्शनास आले. मात्र संध्याकाळची वेळ झाल्याने रोहा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. अक्षय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. माळी, डॉ. पी. के. धुमाळ, डॉ. व्ही. डी. भगत, डॉ. बी. जे. पाटील,डॉ. वाय. एन. सुरकुले, परिचारक पांडुरंग भगत यांनी टीमने १८ जुलै रोजी मृत पशूंचे शवविच्छेदन केले.

याप्रसंगी चणेरा सजा तलाठी बैकर, ग्रामसेवक आर. पी. पाटील, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आत्माराम कासार, जितेंद्र जोशी, पोलीस पाटील सुनिल कासार तसेच गावातील पशुपालक उपस्थित होते. जनावरांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावरच लक्षात येईल असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अक्षय सांगळे यांनी सांगितले.

गावातील प्रकाश कासार, संतोष मिरगळ, सुनिल कासार, महादेव शिंदे, मोहन केबळे, दिपक शिंदे, सुशील कासार, चेतन कदम, शैलजा महाडीक, श्याम कासार, जितेश पाटील या पशुपालकांची जनावरे दगावली आहेत. गुरांच्या मागील पायातील त्राण जाते त्यानंतर गुरांना उठता येत नाही, काही खात नाहीत, दुर्गंधी येते व दोन ते तीन दिवसांत गुरांचा मृत्यू होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पशुपालकांना मार्गदर्शन करुन इतर आजारी पशूंची तात्काळ तपासणी करून त्या पशूंवर आवश्यक उपचारही करण्यात आले असून त्यांना लसीकरण देखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version