। जम्मू काश्मीर । वृत्तसंस्था ।
जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात आज (11 ऑक्टोबर) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे 5 जवान शहीद झालेत. यात एका ज्युनियर कमिशंड ऑफिसरसह 4 सैनिकांचा समावेश आहे. सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली.
भारतीय सुरक्षा दलाला पुंछमधील सुरनकोटच्या डेरा की गली गावात काही दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर सुरक्षा दलाने या भागाला घेराव घालत शोध मोहिम सुरू केली. याच दरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. यात 4 जवानांसह एक कनिष्ठ अधिकारी जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला.
सैन्य अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून चरमेरच्या जंगलात लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. चकमकीनंतर आता या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आलंय. दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून पूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आलीय. जंगलात 4-5 दहशतवादी मोठ्या शस्त्रसाठ्यासह असल्याचा अंदाज आहे.