सरकारविरोधी मोर्चात रायगडातून ५ हजार कार्यकर्ते जाणार

जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शनिवार दि. 17 डिसेंबर रोजी आयोेजित करण्यात आलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातील महाविकास आघाडीच्या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्ह्यातून सुमारे पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहीती शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड आस्वाद पाटील यांनी केले. या मोर्चात सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांनी लाल बावटा फडकवत सहभागी होण्याचे आवाहन देखील आस्वाद पाटील यांनी केले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातील महाविकास आघाडीच्या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायचे आवाहन पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले होते. त्यानुसार या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यातील मोठया संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या मोर्चानिमित्त प्रत्येक तालुक्यात बैठका आयोजित करुन मोर्चाचे नियोजन देखील करण्यात आले आहे.

18 डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत असून 191 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. सर्वच तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीत मतदान आहे. त्या गावातील पदाधिकारी कार्यकर्ते वगळता इतर सर्व गावातील तसेच शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते या महामोर्चात सहभागी होणार आहेत. शेकापक्षाची शिस्त पाळत सर्व पदाधिकार्‍यांनी लाल बावटा फडकवत या र्मार्चात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा चिटणीस अ‍ॅड आस्वाद पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version