आ. जयंत पाटील यांचे शेकाप कार्यकर्त्यांना आवाहन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून अवमान करण्याची भुमिका सांप्रतचे राजकारणी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची होणारी विटंबना, अवहेलना, एकेरी उल्लेख केला जात आहे. तसेच सीमा प्रश्नाचा लढा शेकापक्षानेच तेवत ठेवला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा या विरोधात लढा देण्याची गरज आहे. त्यासाठी शनिवार (दि. 17) आयोेजित करण्यात आलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातील महाविकास आघाडीच्या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा! असे आवाहन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
शेतकरी भवन येथे शेकापक्षाच्या जिल्हा चिटणीस मंडळाच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार धैर्यशिल पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, राजिम बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, नारायण घरत, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जि.प.च्या माजी अध्यक्ष अॅड. निलीमा पाटील, माजी जि.प. सदस्या चित्रा पाटील, अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील, खाालापूरचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम, सीमा घरत आदी उपस्थित होते.
आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, भाषावार प्रांतरचनेनुसार बुहनमुंबई कच्छपर्यंत आणि राजधानी मुंबई असा डाव मोरारजी देसाई यांचा होता. त्याविरोधात मोठा संघर्ष झाला. तेच राजकारण सांप्रतचे राजकारणी करताहेत. देशाचा एकच झेंडा, एकच सैन्य, एकच रेल्वे, एकच आयकर अशा गोष्टी निश्चित असताना कर्नाटकचा झेंडा वेगळा आहे त्याचे गांभिर्य कोण घेत नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. याविरोधात आपण आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातील महाविकास आघाडीच्या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायचे असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. कर्नाटकच्या आजूबाजच्या खेड्यांमध्ये आरएसएसचे लोक महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत. नियोजनपूर्वक येऊन महाराष्ट्रात गढूळ वातावरण करीत आहेत. गुजरात, तेलंगणा कधीच वाद नव्हते. मात्र किनार्यावरचे लोक कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्रपदेश मध्ये जायला बघतात ही खूपच गंभीर बाब आहे. आरएसएसचे कार्यकर्ते तयार करुन पाठवले जात आहेत. राज्यपाल उघड उघड छ. शिवाजी महाराजांचा अवमान करतात, नगण्य समजतात. एवढी कोणाची हिम्मत नव्हती झाली. राष्ट्रपतीदेखील याबाबत कोणतीही भुमिका घेत नाहीत याची त्यांनी खंत व्यक्त केली.”
त्यामुळे सर्वांनी याविरोधात एकत्र येण्याची गरज आहे. उद्याचा मोर्चा विराट होईल, दोन तीन लाख लोक या मोर्चात सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोर्चासाठी ट्रेनने मुंबईत लाल बावटा फडकवत या असेही त्यांनी आवाहन केले.