५४ गायींचा मृत्यू, ३० गंभीर; कणेरी मठात धक्कादायक घटना

शिळे अन्न दिल्याची चर्चा
| कोल्हापूर | प्रतिनिधी |
कणेरी मठावर सुरू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात तब्बल 54 गायींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तब्बल 30 गायी गंभीर आहेत.त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिळे खाऊ घातल्यानं गायींचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. कोल्हापुरातील कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे. यासाठी देशातून हजारो नागरिक येथे येत असून, येथे जनावरांचं प्रदर्शन देखील भरवण्यात आलं आहे. मठावर भव्य अशी गायींची गोशाळा देखील आहे. या गोशाळेतील गायींना शिळे अन्न खाऊ घातल्याने मठातील तब्बल ते 54 गायींचा मृत्यू झाला आहे.

मोठ्या प्रमाणावर गायींचा मृत्यू झाला असून 30 गायी गंभीर असून, त्यांच्यावर गोशाळेमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, मठाकडून माहिती लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असून, लाखो करोडो रुपये खर्चून मठावर सुरू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाला या कारणामुळे गालबोट लागलं आहे. कोल्हापुरातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या टीमकडून रात्रीपासून गायींवर उपचार सुरू आहेत. मात्र, मृत झालेल्या गायींचा अधिकृत आकडा सांगण्यास पशुवैद्यकीय अधिकारीदेखील तयार नाहीत. मृत गायींचे पोस्टमार्टम करून त्याचा तपास केला जाणार असून, मठाकडून माहिती लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असून, लाखो करोडो रुपये खर्चून मठावर सुरू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाला गालबोट लागलं आहे.

दरम्यान एका ठिकाणी हजारो भाकरी चपात्यांचा ढीग लागला असल्याचेदेखील दिसून येत असून, अन्न वाया जाऊ नये याकरिता हे सर्व येथील गायींना खाऊ घालण्यात येत आहे. हा सर्व प्रकार काल रात्रीपासून घडत असून, मृत झालेल्या अनेक गायींना पुरण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. पर्यावरणाचे महत्त्व व प्राण्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी येथे प्रदर्शन भरवण्यात आले असून, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील येथे लावण्यात आले आहेत. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी नागरिकांनी येथे हजेरी लावली. या प्रदर्शनाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने रोज हजारो किलोचे जेवण वाया जात आहे. यामुळे यातील भाकरी चपातीचे ठिकठिकाणी डोंगर झाले असून, हेच सर्व येथील पशुंना खाऊ घातले जात आहे यामुळे कदाचित विषबाधा होऊन गायी दगावल्या असल्याची शक्यता आहे.

Exit mobile version