| मुंबई | प्रतिनिधी |
बलात्काराच्या घटनेमुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. वांद्रे रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस ट्रेनमध्येच 54 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला हरिद्वारवरून फिरण्यासाठी मुंबईला आली होती. तिकीट विचारण्याच्या बहाण्याने त्या व्यक्तीने महिलेवर बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे. शनिवारी मध्यरात्री दीड वाजता नराधमाने त्या महिलेवर एक्स्प्रेसमध्ये बलात्कार केला. 54 वर्षीय महिला आपल्या 19 वर्षीय मुलासोबत हरिद्वारमधून फिरण्यासाठी मुंबईला आली होती. एका नातेवाईकाकडे जायचं होतं, पण उशीर झाल्यामुळे प्लॅटफॉर्म सहा आणि सातच्या मध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, रात्री एक वाजता 27 वर्षीय व्यक्ती आला. त्याने गुपचूप मला उठवले तिकिट तपासण्याचा नावाखाली मला दूर नेलं. चौकशी करू लागला आणि जबरदस्तीने एक्सप्रेस ट्रेनमध्ये ढकलले आणि अत्याचार केला. महिलेने आपल्यासोबत घडलेली घटना मुलाला आणि नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर सर्वांनी वांद्रे जीआरपी स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीची ओळख पटवली आणि त्याला बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी स्टेशनवर हमाल म्हणून काम करत होता. एक्सप्रेस ट्रेनचे केबिन कसं उघडं राहिलं? त्याचा तपास करण्यात येत आहे.