| गोंदिया | प्रतिनिधी |
गोंदिया तालुक्यातील अरततोंडी/ दाभना येथील दोन चुलत भावांचा गावाशेजारील तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.2) दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास घडली. रितीक रुपराम पातोडे (13), दुर्गेश धनंजय पातोडे (13) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अरततोंडी येथील रितीक पातोडे व दुर्गेश पातोडे हे गावातीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकत होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मौजमस्ती व खेळण्यात ते दंग होते. अरततोंडी गावाला लागूनच असलेल्या तलावात ते सकाळी दहा ते 11 वाजेच्या सुमारास लहान बैल धुवायला गेले होते. बैल धूत असताना ते खोल पाण्यात गेले. त्यांना पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन्ही मुले आपल्या आई-वडीलांना एकुलते एक होते. अभ्यासात हुशार या दोन्ही मुलांचा शाळेच्यावतीने प्रजासत्ताकदिनी सत्कारही झाला होता. दोन्ही मुलांच्या दुर्दैवी मृत्युमुळे गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सोनटक्के तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.